
पुणे :- कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. संपुर्ण देशात फक्त मोदी पॅटर्न चालणार, असं वक्तव्य उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज गुरुवारी पुण्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, येत्या निवडणुकीत कोणताही पॅटर्न चालणार नाही. फक्त मोदी पॅटर्न चालणार आहे. त्यामुळे पुढील सत्ता आपलीच असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात आपला पराजय झाल्याबरोबर काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही, तेही आपल्यालाच पोरगा झाला अशा आनंदात उड्या मारत आहेत. या निवडणुकीत ज्यांचा एकही माणूस निवडून आलेला नाही, तेही आनंद साजरा करतायत. त्याचवेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सर्व १७ महापौर थेट निवडणुकीत निवडून आले. पण त्याची चर्चा झाली नाही. तिथे देवबंदसारखी नगरपालिकाही भाजपने जिंकली असं देखील फडणवीस म्हणाले.
आत्ताच्या शिल्लक सेनेने न्यायालयात आठ याचिका दाखल केल्या होत्या. त्यातली एकही याचिका न्यायालयाने मान्य केली नाही. पण उद्धवजी, म्हणतायत गावोगावी जा आणि आपलाच विजय झालाय असं सांगा. आपल्या बापाचं काय जातंय. पण तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका, पोपट मेलाय. पण उद्धवजींना कुणी हे सांगायला तयार नाही की पोपट मेलाय, असा जोरदार टोला फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला.