
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज निकाल
मुंबई 13 मे 2023- संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या व महिनाभर विविध आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (१३ मे) जाहीर होणार आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार? की भाजप सत्तेत कायम राहणार? याचा फैसला काही तासांत होणार आहे. आज दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झालं होतं. निवडणुकीत ७२.६७ टक्के मतदान झाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २ हजार ६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २ हजार ४३० पुरुष, तर १८४ महिला उमेदवार आणि एक तृतीयपंधी उमेदवाराचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांचे भवितव्य १० मे रोजी मतदान पेटीत बंद झालं होतं.
मतदानानंतर समोर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बहुमतात अथवा त्याच्या जवळपास दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा निकालात एक्झिट पोलचे आकडे बदलले आहेत. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलने त्यांची अंतिम आकडेवारी अपडेट केली आहे. यापूर्वी यात काँग्रेसला १०० ते ११२ जागा देण्यात आल्या होत्या, त्या आता १२० ते १४० करण्यात आल्या आहेत. अर्थात, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता आहे. याशिवाय, भाजपच्या जागा ५९ ते ७९ च्या दरम्यान कमी करण्यात आल्या आहेत. जेडीएसला १६ ते २६ जागा मिळू शकतात. तसेच, दोन ते सहा जागा इतरांच्या खात्यातही जाऊ शकतात, असे एक्झिट पोलचे आकडे सांगतात.