भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर इथं खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशनं पहिल्या डावात तीन विकेट गमावत 107 धावा केल्या होत्या.
कानपूर : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि नजमुल हुसैन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (27 सप्टेंबर) कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरु झाला. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशनं पहिल्या डावात तीन विकेट गमावत 107 धावा केल्या होत्या. मोमिनुल हक 40 आणि मुशफिकर रहीम 6 धावांवर नाबाद आहेत. खराब प्रकाश आणि पावसामुळं पहिल्या दिवशी केवळ 35 षटकंच खेळ झाला.
भारतीय संघ मालिकेत 1-0 नं आघाडीवर-
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. यासह भारत या मालिकेत 1-0 नं आघाडीवर आहे. रविचंद्रन अश्विननं पहिल्या सामन्यात अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती.
आकाशदीपनं घेतल्या दोन विकेट-
या सामन्यात बांगलादेशनं फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यावर डावाची चांगली सुरुवात केली. पण या सामन्यात गोलंदाजी करायला आलेल्या आकाश दीपनं बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसनला स्लिपमध्ये यशस्वी जैस्वालकडे झेलबाद केले. त्यावेळी बांगलादेश संघाची धावसंख्या 26 होती. त्यानंतर धावफलकावर केवळ 29 धावा असताना आकाश दीपनं शदमान इस्लाम (24) यालाही पायचीत करत दुसरी विकेट घेतली. तर उपहारानंतर तिसरी विकेट अश्विननं घेतली.
कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये भारताची कामगिरी-
1952 मध्ये ग्रीन पार्क, कानपूर इथं पहिला कसोटी सामना खेळला गेला. तेव्हापासून इथं एकूण 23 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या 23 सामन्यांमध्ये भारतीय संघानं इथं 7 सामने जिंकले आहेत. त्यांना 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर 13 सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशचा संघ कानपूरच्या मैदानावर प्रथमच कसोटी सामना खेळत आहे.