हिंदुत्वावर बोलल्यामुळे ३० – ४० कोटी
गमवावे लागले; कंगना रणौत स्पष्टच बोलली…

Spread the love

मुंबई :- अभिनेत्री कंगना रणौत आपल्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तसेच, ती जाहीरपणे हिंदुत्वाच्या बाजूने बोलते. आता परत एकदा तिने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, यात तिने ‘तुकडे-तुकडे’ गँगचा उल्लेख केला आणि हिंदुत्वासाठी मोठी किंमत मोजावी लागल्याचेही सांगितले.
कंगनाने इंस्टाग्रामवर उद्योगपती इलॉन मस्क यांची एक बातमी शेअर केली आहे, ज्यामध्ये इलॉन मस्क यांनी म्हटले की, ‘मला आर्थिक नुकसान सहन करावे लागले तरीदेखील चालेल, पण मी मला जे हवे ते मी बोलेन.’ हे शेअर करत कंगनाने तिला झालेल्या आर्थिक नुकसानाबद्दल सांगितले. ‘हिंदुत्वासाठी बोलण्याची आणि राजकारणी, तुकडे-टुकडे गँग आणि देशद्रोही लोकांविरोधात आवाज उठवण्याची किंमत भोगावी लागली आहे. उघडपणे बोलल्यामुळे अनेक ब्रँडच्या जाहिराती गमवाव्या लागल्या आणि त्यामुळे मला वार्षिक ३० ते ४० कोटी रुपयांचे नुकसान झाले,’ असा दावा तिने केला आहे.
ती पुढे म्हणाली की, माझ्यासोबत काहीही घडले असले तरी आता मी स्वतंत्र आहे. एक खास अजेंडा असलेली कोणतीही आंतरराष्ट्रीय कंपनी मला रोखू शकत नाही. या कंपन्यांचे प्रमुख भारत आणि इथल्या संस्कृतीचा तिरस्कार करतात. मला जे बोलायचे आहे ते बोलण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. पोस्टमध्ये तिने इलॉन मस्कचे कौतुक केले. ती म्हणाली, प्रत्येकजण त्यांची कमजोरी दाखवतो. निदान श्रीमंतांनी तरी पैशाचा विचार करू नये.
कंगना राणौतच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची २०२२ मध्ये ‘धाकड’ चित्रपटात दिसली होती. कंगनाने तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. कंगनाने सांगितले की, चित्रपट रिलीज होण्यास एक महिना बाकी असताना ती या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करणार आहे. ट्रेलरसोबतच रिलीज डेटही जाहीर करण्यात येणार आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page