
कन्नडचा जन्म तमिळ भाषेतून झाला आहे, असं वक्तव्य कमल हसन यांनी चेन्नईमध्ये झालेल्या एका समारंभात केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर कर्नाटकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कर्नाटक /बेंगलोर- तमिळ सिनेसृष्टीतील मेगास्टार आणि राजकारणी कमल हासन यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘ठग लाइफ’ च्या प्रचाराच्या कार्यक्रमात एक वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. कन्नडचा जन्म तमिळ भाषेतून झाला आहे, असं चेन्नईमध्ये झालेल्या एका समारंभात बोलतांना त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर कर्नाटकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे. सोशल मीडियावर ‘ठग लाइफ’ चित्रपटाच्या बहिष्काराची मोहिम सुरू झाली आहे. दरम्यान खरंच कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे का? का सांगतो दक्षिण भारतातील भाषांचा इतिहास? जाणून घेऊया…
कन्नड भाषेचा इतिहास काय सांगतो?…द्रविड भाषासमूहातील प्राचीन भाषा
कन्नड ही द्रविड भाषासमूहातील एक प्रमुख आणि प्राचीन भाषा आहे. भाषाशास्त्रज्ञांच्या मते, कन्नड भाषेची उत्पत्ती सुमारे इ.स.पू. 950 च्या सुमारास प्रोटो-दक्षिण द्रविड भाषेतून झाली आहे. तमिळसह मल्याळम, तेलुगू आणि तुळू या भाषाही याच भाषासमूहात मोडतात. मात्र, त्यांचे परस्पर संबंध सह-उत्पत्तीचे आहेत, एकमेकांपासून निर्माण झालेल्या नाहीत.
*पुरातत्वीय आणि ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?
सम्राट अशोक आणि कन्नड
सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेखांमध्ये आढळणारे ‘इसिला’ हे शब्दप्रयोग कन्नड भाषेतील असल्याचं प्रख्यात इतिहासकार डी.एल. नरसिंहाचार यांनी सांगितलं आहे. यावरून स्पष्ट होतं की इ.स.पू. तिसऱ्या शतकातही कर्नाटकात कन्नड भाषा बोलली जात होती.
प्राचीन साहित्य आणि लिपी-
हल्मिडी शिलालेख (इ.स. 450 च्या सुमारास) हा कन्नड भाषेतील सर्वात जुना लेखी पुरावा मानला जातो.
कप्पे अरभट्टचा शिलालेख (इ.स. 700) ही पहिली कन्नड कविता मानली जाते.
कविराजमार्ग (9वी शताब्दी) हे पहिले उपलब्ध कन्नड साहित्यिक ग्रंथ मानले जाते.
लिपींचा विकास-
कन्नड लिपीचा विकास कालानुसार विविध टप्प्यांमध्ये झाला आहे:
कदंब लिपी – 5व्या शतकात वापरली गेली.
गंग लिपी, बादामी चालुक्य लिपी, राष्ट्रकूट लिपी, कल्याण चालुक्य लिपी – प्रत्येक राजवंशाने वेगवेगळ्या लिपींमध्ये लेखन केलं.
होयसल लिपी – सर्वात सुंदर आणि कलात्मक लिपी मानली जाते. आजची आधुनिक कन्नड लिपी ही याच लिपीवर आधारित आहे.
इतिहास आणि भाषाशास्त्र स्पष्टपणे दर्शवतात की कन्नड आणि तमिळ या दोन्ही भाषा प्रोटो-द्रविड भाषेपासून स्वतंत्रपणे विकसित झालेल्या आहेत. त्या एकमेकींशी संबंधित असल्या तरी एकमेकांपासून जन्मलेल्या नाहीत. त्यामुळे कमल हासन यांचे विधान की “कन्नड तमिळपासून निर्माण झाली आहे” हे ऐतिहासिकदृष्ट्या अचूक नाही. भाषिक अभिमान असलेल्या कर्नाटकवासीयांनी या वक्तव्याचा निषेध केल्याचे आश्चर्य नाही.