ठाणे ; निलेश घाग मध्य रेल्वेवरील कल्याण, ठाणे, डोंबिवली या रेल्वे स्थानकात भरपूर गर्दी असते. या स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई लोकलसाठी मागील वर्षीच्या तुलनेत 29 टक्क्यांची अधिक तरतूद केली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)साठी 789 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. MUTP साठी केंद्र सरकार जितकी रक्कम देते तितकीच राज्य सरकारला देखील द्यावे लागते. म्हणजेच यंदा मुंबई लोकलसाठी एकूण 1578 कोटींचा खर्च केला जाणार आहे. बजेटमध्ये केलेल्या आर्थिक तरतुदीनंतर कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाबाबत हालचालींना वेग येणार आहे.
मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण ठरलेले असते. लोकलची गर्दी कमी व्हावी, नागरिकांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहे.
कल्याणच्या पुढेही लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळं कर्जत-कसारावरुन मुंबईकडे येणाऱ्या गाड्यां या आधीपासूनच भरुन येतात. त्यामुळं कल्याणकरांना गर्दी मिळते. कल्याण स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी कल्याण ते बदलापूर दरम्यान दोन मार्गिका उभारण्याची योजना आखण्यात आली. सध्या कल्याणच्या पुढे दोनच रेल्वे मार्गिका आहेत. याच मार्गिकेवर लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाड्या धावतात. जर, मार्गिकेचा विस्तार झाला तर लोकलची संख्यादेखील वाढवण्यात येतील. भविष्यात अधिक लोकल चालवण्यासाठी पर्याय उपलब्ध होतील.
कल्याणमधील या मार्गिकेवरुन धावणाऱ्या ट्रेनची स्पीडदेखील वाढणार आहे. तसंच, चार रेल्वे रूळ असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाड्यांचा मार्गदेखील डायव्हर्ट केला जाता येईल. या रूटमुळं मुंबईहून ऑपरेट होणाऱ्या ट्रेन त्याचबरोबर दक्षिण भारताच्या दिशेने जाण्याऱ्या व येणाऱ्या ट्रेनला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. अशावेळी तिसऱ्या-चौथ्या मार्गिका उभारणे काळाची गरज आहे.
कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका प्रकल्पासाठी एक हजार 510 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 15 किमीच्या या मार्गावर 49 पूल, चार रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत.
जाहिरात