श्रीकृष्ण खातू /धामणी- संगमेश्वर तालुक्यातील गोळवलीतील परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प येथे परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती केंद्राचे भूमिपूजन श्री भैय्या जोशी, अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांच्या शुभहस्ते व गोळवलीच्या सरपंचा शालिनी पतये , तसेच गोळवलीचे गावकर दत्ताराम दुदम , व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
त्यानंतर झालेल्या सभारुपी कार्यक्रमात भैय्याजी जोशी मार्गदर्शन करताना म्हणाले की गावामुळे जशी व्यक्ती मोठी होते तसेच व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे गाव मोठा होतो. आपली अफाट बुद्धिमत्ता, अविस्मरणीय कर्तुत्व, व निस्वार्थी जनसेवा करून संपूर्ण जग पातळीवर परमपूज्य गोळवलकर गुरूजीनी गावाचे त्याचप्रमाणे देशाचे व आपले नाव लौकिक केले असून यापुढे येथे सुसज्ज तयार होणाऱ्या गुरुजींच्या स्मृती केंद्रास प्रत्येक जण नक्कीच भेट देतील, व गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस कायमस्वरूपी उजाळा देण्याचे काम होईल, यासाठी ग्रामविकास प्रकल्पाच्या पंचक्रोशीतील तमाम बांधवांचे खूप मोठे सहकार्य मिळत असून, प्रकल्पाचे व्यवस्थापक देशपांडे उभयतांनी आपल्या कार्य कौशल्याने खूप मोठा जनसंपर्क वाढवल्याने ग्रामविकास नक्की होत आहे असे नमूद केले. आज भूमिपूजन झालेल्या स्मृती केंद्राच्या होणाऱ्या इमारतीची प्रोजेक्टर वरून उपस्थितांना विस्तृत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रशांत पाध्ये यांनी करून सविस्तर माहिती करून दिली
यानंतर प्रकल्पाचे व्यवस्थापक शेखर देशपांडे यांनी गेली सतरा वर्षे प्रकल्पावर काम करताना झालेली वाढ मिळालेले सहकार्य , व,चालू असलेले उपक्रम ,अशा प्रकारचा अनुभव कथन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी सुरेश तथा भैय्या जोशी, (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य), शालिनी पतये, (गोळवली सरपंचा), दत्ताराम दुदम,(गोळवली गावकर), दत्ताराम सोलकर राष्ट्रीय स्वयं संघ भाग संघचालक, संतोष पावरी ,अध्यक्ष राष्ट्रीय सेवा समिती, ॲड प्रशांत पाध्ये, कोषाध्यक्ष राष्ट्रीय सेवा समिती,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील ,ग्रामस्थ, अनेक ठिकाणाहून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.