नेरळ – सुमित सुनिल क्षीरसागर
नेरळ गावातील तरुण कुमार गोटीराम जाधव हे भारतीय सेनेत 17 वर्षे देशसेवा यशस्वीपणे पूर्ण करून आज 2ऑगस्ट रोजी नेरळ येथे पोहचले.नेरळ रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि नेरळ गावातून मिरवणूक काढत टेपआळी येथील घरी नेण्यात आले.
नेरळ गावातील शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख,शहर प्रमुख राहिलेले गोटिराम जाधव यांचा मुलगा कुमार हा 2006 मध्ये भारतीय लष्करात सहभागी झाला होता. बेळगांव येथील मराठा रेजिमेंट येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये देशसेवा करीत होते.या कालावधीत त्यांना शांती दुत म्हणून दक्षिण आफ्रिका या देशात देखील शांतीसैनिक म्हणून सेवा बजावली होती.तर देशातील विविध भागात देशसेवा करीत असताना महत्वाची भूमिका बजावली आहे.त्यात त्यात जम्मू काश्मीर, नॉर्थ ईस्ट मधे आसाम, आरूनाचाल, बलवान घाटी, राजस्थान कोटा, पंजाब पठाणकोट, धर्मशाळा आदी ठिकाणी यशस्वी सेवा बजावली.त्या सेवेत निवृत्ती यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून जम्मू आणि काश्मीर मिडल बार, नॉर्थ ईस्ट मिडल, ओपी रक्षक मिडल,ऑपरेशन पराक्रम मिडल या अवॉर्ड ने त्यांना सन्मानित केले आहे.
बेळगाव येथील कॅम्प मधून पनवेल आणि नंतर कर्जत असा प्रवास करीत निवृत्त जवान कुमार जाधव हे मुंबई कडे जाणाऱ्या लोकलने नेरळ रेल्वे पोहचले.त्यावेळी नेरळ स्थानकात रेल्वे प्रशासनाकडून देशभक्तीपर गाणी वाजवत निवृत्त जवान कुमार जाधव यांचे स्वागत करण्यात आले.तर नेरळ मधील ग्रामस्थांनी कुमार जाधव यांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथक आणि नेरळ गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात हजर होते.आपल्या 17 वर्षाची भारतीय सेनेची सेवा बजावून आलेल्या जवान कुमार जाधव यांचे नेरळ गावात मिरवणूक काढण्यात आली.त्यावेळी भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तीन रंगातील फुलांनी सजवलेल्या गाडी मध्ये जवान कुमार जाधव,त्यांचे वडील गोटीराम जाधव तसेच पत्नी आणि मुलगा सोबत होते.या मिरवणुकीत लेझिम पथक आणि बँड पथक देखील अग्रभागी होते,तर शेकडो नेरळकर सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आपल्या घरी टेपआळी येथे पोहचले.या मिरवणुकीत नेरळ गावातील तरुण वर्ग महिला व प्रतिष्ठित लोक सहभागी झाले होते.