नेरळ ता.सुमित सुनिल क्षीरसागर
कर्जत तालुक्यातील ताडवाडी या आदिवासीवाडी मधील महिला पाण्याच्या एका हंड्यासाठी विहरीवर मुक्काम करत असल्याचे वास्तव दैनिक सकाळने समोर आणले. या बातमीची दखल घेत आमदार श्रीकांत भारतीय हे या घटनेची पाहणी करण्याकरता आज दिनांक ३१ रोजी कर्जतमध्ये आले. त्यामुळे आमदार भारतीय यांनी ताडवाडीमध्ये भेट देत ताडवाडी, मोरेवाडी जल जीवन मिशन योजनेची पाहणी केली. दरम्यान आमदार भारतीय यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत जल जीवन मिशन ही केंद्राची योजना असून या योजनेशी आमच्या भावना जोडल्या आहेत. तेव्हा यात हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही थेट तंबी दिली आहे.
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसते. तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी हि आदिवासी वाडी येते. तालुक्यातील सगळ्यात मोठी हि आदिवासी वाडी असून सुमारे ९०० लोकसंख्या असलेल्या या वाडीत २५० च्यावर कुटुंब राहतात. पाणी टंचाईची झळ सध्या या वाडीला बसते. त्यामुळे दरवर्षी शासनाकडून पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र तरीही पाणी पुरवठा तोकडा पडत असल्याची खंत ताडवाडी ग्रामस्थांनी व्यक्त करत आहेत. उन्हाळा आता सरत असून पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे पाणी टंचाई तीव्र झाली आहे. ताडवाडी येथील आदिवासी लोकांचे पाण्यासाठी हाल सुरु झाले आहेत. ताडवाडी आणि मोरेवाडी येथील आदिवासी लोकांसाठी नळपाणी योजना राबवली जात आहे. मात्र कामाचा कालावधी संपला असून संथ गतीच्या कामामुळे योजना लांबणीवर पडली आहे. दरम्यान निर्माण झालेली पाणीटंचाई यामुळे येथील महिलांना रात्री विहिरीवर झोपून काढावी लागत असल्याचे भीषण वास्तव दैनिक सकाळने दिनांक ३१ रोजीच्या अंकात समोर आणले.
दरम्यान या बातमीची दखल घेत विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय हे आज दिनांक ३१ रोजी तत्काळ कर्जतमध्ये दाखल झाले. कर्जत तहसिल कार्यालयात दाखल झाल्यावर त्यांनी तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, निवासी नायब तहसिलदार सचिन राऊत, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुजित धनगर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे. तर या योजनेशी आमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या योजनेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. तर आता योजना करून हात वर कराल तर याद राखा. उन्हाळ्यात या योजनेचे आम्ही ऑडिट करणार आहोत. त्यावेळी चुकीचा उद्भव, आदी गोष्टीमुळे योजनेत दोष आढळल्यास त्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी नक्की करण्यात येईल अशी थेट तंबी आमदार भारतीय यांनी दिली. यासह योजनेची पाहणी ताडवाडी येथे जाऊन करत ताडवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांशी भारतीय यांनी संवाद साधला.
दरम्यान ताडवाडी येथील जल जीवन मिशन योजनेचे काम १५ दिवसात पूर्ण होईल अशी ग्वाही लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांनी भारतीय यांना दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, जेष्ठ कार्यकर्ते रमेश मुंढे, प्रदेश सरचिटणीस सुनील गोगटे, ऋषिकेश जोशी, अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, युवा नेते किरण ठाकरे, जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष संदीप म्हसकर, आदी उपस्थित होते.