रत्नागिरी : महिला त्यांच्या दैंनदिन कामकाजात सकाळच्या वेळी व्यस्त असतात. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्यादृष्टिने संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत ओपीडी सुरु ठेवल्यास त्यांच्यासाठी लाभदायी ठरेल. तशी कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
6 कोटी 22 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन कुदळ मारुन आणि कोनशिलेचे अनावरण करुन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रंसगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अमजद बोरकर, दीपक नागले, राजू कुरूप आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आरोग्याची सुविधा नागरिकांसाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करा. महिला त्यांच्या दैंनदिन कामकाजात सकाळच्या वेळी व्यस्त असतात. त्यामुळे सकाळच्या ओपीडी बरोबर सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ओपीडी सुरू ठेवली पाहिजे, त्याचा महिलांना फायदा होईल. महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने संध्याकाळची ओपीडी त्यांच्यासाठी लाभदायी ठरेल, त्याविषयी कार्यवाही करा, अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.
ते म्हणाले, लांजा राजापूर मतदार संघात गेल्या तीन-चार महिन्यात आरोग्य विभागाने क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. यामध्ये लांजा रुग्णालय स्थलांतर असेल वा नवीन रुग्णालयाचे बांधकाम सुरुवात, राजापूर ग्रामीण रुग्णालयात चांगली सुविधा उपलब्ध करून देणे, 56 कोटी रुपये खर्चुन बांधण्यात येत असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, तसेच भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्र साडेसहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. रत्नागिरीच्या धर्तीवर राजापूर येथे जानेवारीमध्ये कॅशलेस हॉस्पिटल सुरू केले जाईल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. यासोबतच पाणी प्रश्न धरणाच्या कामाचे प्रश्नही मार्गी लावण्यात आल्याचे ते म्हणाले.
प्रकल्पाबाबत आंदोलन केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यश आले आहे. कोणत्याही प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनातील गैरसमज दूर करून, ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच प्रकल्प बाबत निर्णय घेण्यात येईल. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे, कणा आहे, त्याच्याविरोधात जाऊन कोणतीही भूमिका घेण्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.
माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, या योजनेचे तीन हप्ते जमा झाले आहेत. माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आचारसंहितेपूर्वी तुमच्या खात्यात जमा होईल. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज अणि धन्वंतरीचे पूजन करण्यात आले.