छत्रपती संभाजीनगर, नवी दिल्ली- पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहमंद दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश जम्मू-काश्मिरातील एकूण १९ ठिकाणी धाडी टाकल्या. तरुणांची माथी भडकावून त्यांना देशविघातक कारवाया करण्यासाठी जैश संघटनेत भरती करण्याचे कारस्थान असल्याचा संशय आहे. याप्रकरणी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि भिवंडीतून एकूण ३ तरुणांना ताब्यात घेण्यात आले.
संंभाजीनगरच्या बीड बायपास भागातील २२ वर्षांच्या तरुणाला एका मदरशातून ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (११ डिसेंबर) मध्यरात्री अडीचच्या सुमारास करण्यात आली. एनआयएच्या ताब्यात असलेला तरुण हा मुंबईच्या कुर्ला येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले. तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर टीव्ही सेंटर भागात असलेल्या एटीएस कार्यालयात नेण्यात आले. तब्बल १२ तासांहून अधिक काळ त्याची चौकशी सुरू होती.
३ मोबाइल केले हस्तगत…
एनआयएचे पथक सातारा हद्दीतील एका मदरशात रात्री गेले. त्यांनी २२ वर्षांच्या तरुणाची चौकशी केली. त्याचबरोबर त्याच्या ताब्यातून तीन मोबाइल जप्त केले. तो संघटनेच्या काही संशयास्पद व्यक्तींच्या संपर्कात होता. त्यांना फाॅलो करत होता.
‘आलीम’चे शिक्षण घेत होता..
संभाजीनगरात ताब्यात घेतलेला तरुण कुर्ला येथील रहिवासी असून ताे मदरशात आलीमचे शिक्षण घेत होता. दिल्लीतील एका जैशच्या हस्तकाशी संपर्कात हाेता.
अमरावतीच्या तरुणाच्या घराची एनआयएकडून झडती…
अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छायानगर येथून मोहंमद मुसैब शेख इसा (२३) एनअायएने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरी गेलेले एनआयएचे पथक जवळपास चार ते पाच तास त्याच्या घरी होते. त्यानंतर मोहंमद मुसैबला ताब्यात घेऊन राजापेठ पोलिस ठाण्यात आणले.सुमारे १२ तास चाैकशी त्याची सुरू होती.
भिवंडीतून ताब्यात घेतलेला तरुण मालेगावचा रहिवासी…
भिवंडी शहरालगतच्या खोणी – खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पहाटेच्या सुमारास कामरान अन्सारी (४५) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. कामरान अन्सारी हा खाडीपार परिसरात असलेल्या डोंगरकर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबासह राहत होता. कामरान हा मूळ मालेगावचा रहिवासी असून तो कल्याणमधील एका खासगी कंपनीत काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.