जयगड बंदराला ‘हब’ म्हणून विकसित करणार – ना. नितेश राणे,आंबा, काजू आणि मत्स्य निर्यातीसाठी सक्षम पर्याय उभारणार…

Spread the love

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे कोकण महाराष्ट्राशी अधिक जोडला जाईल,कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणार…

रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकणातील अर्थव्यवस्था आणि विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदराचा ‘हब’ म्हणून विकास करण्यात येणार असून, यामुळे आंबा, काजू व मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी जयगड बंदर सक्षम पर्याय ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. जयगड येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीचे अधिकारी, कोकण रेल्वे, मत्स्य व्यवसाय, कृषी, अपेडा, मित्रा तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने जयगड बंदराचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यावर चर्चा झाली.

ना. राणे म्हणाले की, सध्या आंबा, काजू व मासळीची निर्यात प्रामुख्याने जेएनपीटी बंदरातून होते. मात्र वाहतूक खर्च आणि लॉजिस्टिक्स वाढल्याने उत्पादकांवर अतिरिक्त भार पडतो. हा खर्च कमी करून स्थानिक उत्पादकांना थेट फायदा मिळावा यासाठी जयगड बंदराचा विकास करण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक सवलती व मदतीवरही बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीत कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग हा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून, हा मार्ग सुरू झाल्यास कोकणाचा विकास वेगाने होईल व जयगड बंदराला त्याचा मोठा फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक शेतकरी व नागरिकांचे जीवनमान उंचावणे हाच या बैठकीचा मूळ उद्देश असल्याचे ना. राणे यांनी सांगितले. उत्पादनांची गुणवत्ता टिकवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची क्षमता वाढवण्यावर आणि वाहतुकीचे अंतर कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच विविध तालुक्यांना जलमार्गाद्वारे जोडण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ प्रस्ताव तयार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जेएसडब्ल्यूसारख्या देशातील मोठ्या कंपनीचा सहभाग या विकासकामात महत्त्वाचा ठरेल, असे सांगून राणे म्हणाले की, या सर्व प्रयत्नांमुळे कोकणातील व्यापार, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडेल.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page