नाणीज, दि. १९:- जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेतील चिमुकल्यांनी विविध वेशभूषा सादर केल्या. त्यामुळे हा सोहळा अधिक रंगतदार झाला.
मुलामुलींनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता , सोयराबाई, सईबाई यांच्या वेशभूषा केल्या होत्या. तर काही जण तानाजी मालुसरे, जिवा महाल असे विविध मावळे बनले होते. सर्वांचे ते आकर्षण होते.
सुरुवातीला प्रशालेतून प्रभातफेरी काढण्यात आली. छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत ती दिंडीगेटमधून महाद्वारपर्यंत निघाली. त्यानंतर महाद्वार येथिल छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, तसेच जिजामाता यांचे स्मारक व आई तुळजाभवानी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त शांताराम दरडी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अबोली पाटील, ज्येष्ठ शिक्षक कीर्तीकुमार भोसले या मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महाराजांच्या शौर्य गीतावरती लेझीम प्रदर्शित केले.
यापूर्वी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध किल्ले तयार करण्याची स्पर्धा घेतली होती. त्यात काही किल्ले इको फ्रेंडली बनवले होते. त्या किल्ल्यांचे परीक्षक म्हणून आलेल्या ज.न.म संस्थानचे सिव्हील इंजिनियर स्वप्निल राऊत व महेश सावंत यांनी काम पाहिले. प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले होते. त्यानंतर प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, माता सरस्वतीश्री गणेश यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अबोली पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी भाषणे झाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी श्रेया विभुते हिने केले. आभार बाबूलाल सौदागर यांनी मानले. सर्व विद्यार्थ्यांना संस्थांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
फोटो ओळी-
नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रशालेत सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. त्यावेळी शिवराय व मावळ्यांच्या वेशातील मुले.