नवीदिल्ली- चांद्रयान-३ आणि आदित्य एल-१ मोहिमेमंतर आता भारताचं लक्ष्य शुक्र ग्रहावर आहे. चंद्र आणि सूर्य मोहिमेनंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो शुक्र मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. इस्रोकडून आता शुक्रयान मोहिमेच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. शुक्र ग्रहावरील वातावरण आणि त्यांचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख सोमनाथ यांनी शुक्रयान मोहिमेसंदर्भात माहिती दिली आहे. इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी सांगितलं की, शुक्र ग्रहावरील वातावरणाबाबत संशोधनासाठी इस्रो तेथे एक मोहिम राबवणार आहे. शुक्र ग्रहाचं वातावरण आणि तेथील आम्लीय वायूंबाबत समजून घेण्यासाठी एक मोहिम हाती घेतली जाणार आहे. राष्ट्रीय विज्ञान अकादमीमध्ये व्याख्यान देताना इस्रो प्रमुखांनी शुक्रयान मिशनबाबत माहिती दिली आहे. शुक्र आणि मंगळ ग्रहांवर जीवन का नाही. या ग्रहांबाबत अधिक खोलवर समजून घेण्यासाठी तिथे मोहिम पाठवणं आवश्यक आहे. इस्रोकडून शुक्रयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, सरकारकडून शुक्रयान मोहिमेसाठी अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
शुक्र ग्रहाभोवती ढगांचा थर जमा झाला आहे. त्यामध्ये आम्ल भरलेलं असतं. त्यामुळे कोणतेही अंतराळयान किंवा वाहन आम्लीय ढगांचे वातावरण ओलांडून शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचू शकत नाही. सूर्यमालेच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळविण्यासाठी शुक्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. इस्रोकडून गगनयान मोहिमेची तयारीही सुरू आहे. भारताच्या मानवी अंतराळ मोहीमेला ‘गगनयान’ असं नाव देण्यात आलं आहे. गगनयान मोहिम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या पहिल्या मानवी अंतराळ मोहीमअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे.