जेरूसलेम- इस्रायलच्या संरक्षण दलांनी लेबनॉन सीमेवर हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं आहे. लेबनॉनमध्ये सतत हल्ले सुरु आहेत. ज्यामध्ये हिजबुल्लाहच्या अनेक कमांडर आणि सैनिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधील सीमेजवळील गावांवर हल्ले करून हिजबुल्लाहची ठिकाणं नष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. या ऑपरेशनला नॉर्दर्न एरो असे नाव देण्यात आले आहे.
आयडीएफने सांगितले की, इस्रायलच्या सैन्याने उत्तर इस्रायलला धोका निर्माण करू शकतील अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी सीमा ओलांडली. आयडीएफने ट्विटरवर लिहिले, “आम्ही दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर अचूक बुद्धीमत्तेच्या आधारे लक्ष्यित जमिनीवर हल्ले केले आहेत. या कारवाईला ऑपरेशन नॉर्दर्न ॲरो असे नाव देण्यात आले आहे. ऑपरेशन ‘नॉर्दर्न एरो’ च्या माध्यमातून IDF आपले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी युध्द सुरू ठेवणार आहे . उत्तर इस्रायलमधील नागरिकांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले की, लेबनॉनच्या दक्षिण सीमेवर युद्ध सुरू होईल. यानंतर ऑपरेशन नॉर्दर्न ॲरो सुरू झाले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्याच्या योजनेत सीमेच्या उत्तरेकडील जमिनीच्या छोट्या पट्टीवर कारवाईचाही समावेश आहे.
इस्रायलने केलेल्या हल्ल्यावर हिजबुल्लाहनेही आक्रमक भूमिका दाखवली आहे. हिजबुल्लाहचे उपनेते शेख नइम कासिम यांनी सांगितले की, जर इस्रायलींनी लेबनॉनमध्ये प्रवेश केला तर आम्ही त्यांचा सामना करण्यास तयार आहोत. आम्ही आमची सर्व शक्ती लेबनॉनचे रक्षणासाठी पणाला लावू. नसराल्लाहच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहला मोठआ धक्का बसला आहे. इस्रायलने हवाई हल्ला करत तळघरात असलेल्या हिजबुल्लाहच्या प्रमुखाला ठार केले होते. त्यानंतर उपप्रमुख नईम कासिम यांनी सांगितले की, त्यांचे सैनिक जमिनीवरील लढ्यासाठी एकजूट आहेत. कासिमने म्हटले की, हिजबुल्लाहच्या विजयावर त्यांना विश्वास आहे. 2006 मध्ये आम्ही जिंकलो होतो आणि यावेळीही आम्ही जिंकू. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्करी कारवाई पुढे सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे. हिजबुल्लाह आणि इराणवर निशाणा साधत नेतान्याहू म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायल पोहोचू शकत नाही. एका वृत्तानुसार इस्रायलने अमेरिकेला लेबनॉनवर हल्ला करणार असल्याचेही सांगितले आहे.