ठाणे : ठाणे महापालिकेचे वादग्रस्त साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची ठाणे पोलिसांनी सुमारे तासभर चौकशी केली. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे पोलिसांकडे आहेर यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, चौकशीसंदर्भात पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. आहेर यांच्याविरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या कुटुंबियांना आहेर यांच्यापासून धोका असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आहेर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फतही स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीने एक ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. या ध्वनिफीतमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जावयाला गुंडामार्फत जिवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. या ध्वनिफीतमधील आवाज हा साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणात आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आव्हाड यांनीही आहेर यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पंरतु आहेर यांच्याविरोधात ठाणे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहेर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.