
आरोग्य : सर्व सामान्यांसाठी योगासारखा कठीण (ज्ञान) मार्ग श्री योगेंद्रजिंनी १०४ वर्षापूर्वी सोपा केला. ‘द योग इन्स्टिट्युट सांताक्रुझचे हे संस्थापक! सर्वांसामान्य माणसासाठी प्रथमच योगासारखा ज्ञानमार्ग खुला करण्याचे प्रथम श्रेय योगेंद्रजींना जाते.
मुंबईला गेल्यावर द योग इन्स्टिट्युट सांताक्रुझ ला जरूर भेट द्या. सांताक्रुझ पूर्वेला स्टेशन पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर प्रभात कॉलनी आहे. उत्तरेकडे सरळ चालत गेल्यावर रस्त्याच्या शेवटी गर्द हिरव्यागार झाडांच्या गर्दीत अवघ्या १० गुंठयाचा क्षेत्रात ह्या आश्रमाची इमारत दिसेल. तिथेच खास गृहस्थिंसाठी योगाचे शिक्षण दिले जाते. हा जगातील पाहिला योग आश्रम की ज्याने सामान्य लोकांसाठी योग आणला. त्याआधी सन्यासी व ऋषी योगाचा मार्ग अवलंबित असतं.
योग इन्स्टिट्युट सांताक्रुझ मुंबईचे संस्थापक श्री योगेंद्रजींनी जीवनाचा उद्धार करणारा व गिरीकंदरात बंद असलेला, ज्ञानमार्ग म्हणजेच राजयोग; सर्वांसाठी खुला केला. तसा सर्व सामान्य माणूस ज्ञानापासून पूर्वीपासून वंचितच राहिला आहे. योगेंद्रजींची एकच तळमळ होती, ती म्हणजे सामान्य माणसाला ज्ञानमार्गाची ओळख होऊन त्याने आपल्या शारीरिक व मानसिक व्याधींना समजून घ्यावे, त्यांची कारणे शोधून नष्ट करावीत. व आपले जीवन आनंदी बनवावे.
योगेंद्रजींनी गुजरातमधील मालसार ह्या गावी असलेल्या भक्तीयोग मार्गी श्री माधवदासजी यांच्याकडे योगसाधना केली. योगाचे शास्त्रशुद्ध ज्ञान प्राप्त केले. त्यांचे गुरू माधवदासजी सन्यासी होते. मात्र योगेंद्रजींनी सन्यास न घेता गृहस्थी धर्म स्वीकारला. सर्वसामान्यांसाठी योगातल्या क्लिष्ट क्रिया, आसने, प्राणायाम, मुद्रा यांचे सुलभीकरण केले. व कित्येक वर्षे ज्ञानाला पारख्या असलेल्या सामान्य माणसासाठी ज्ञानाची कवाडे उघडली. अनेक पंथ संप्रदायांनी देव ह्या संकल्पनेभोवती निर्माण केलेले गूढ वलय नाहीसे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
१९९४ साली माझा, ह्या संस्थेत प्रवेश झाला. त्यावेळी योगेंद्र जी हयात नव्हते. त्यांचे पुत्र डॉ. जयदेव योगेंद्र हे पुढील धुरा सांभाळत होते. त्यांचे वयक्तिक मार्गदर्शन मला लाभले. सन २००० पर्यंत म्हणजे ७ वर्षे मी क्लासिकल योग शास्त्राचा अभ्यास केला. त्यात पतंजलींचा अष्टांग योग, शरीर रचना, मनोकायिक योगतंत्रांचा अभ्यास, विविध शारीरिक व मानसिक आजार असलेल्यांसाठी निवासी व अनिवासी योगाशिबिरांचे ट्रेनिंग इत्यादींचा समावेश होता.
योगाची साधना करीत असतानाच आपल्या कोकणातील भक्तीला ज्ञानाची किती आवश्यकता आहे हे मला त्यावेळी लक्षात आले. कोकणात भक्तीला शास्त्राची जोड मिळाल्यास लोकांना ईश्वराचे खरे स्वरूप कळेल. असे वाटून मी ५ ऑक्टोबर २००० साली मुंबई सोडली. १० जून २००१ साली योग प्रसारासाठी दहागाव , मंडणगड येथे आनंद विहार आश्रमाची स्थापना करून मी माझ्या योगप्रसाराच्या कार्याला सर्वात केली. तिथपासून आजपर्यंत जवळजवळ २१ वर्षे हे कार्य अखंड चालू आहे.
सामान्य माणसापर्यंत योग कसा न्यायचा हाच मोठा प्रश्न होता. त्यात सामान्य माणूस शेतकरी होता. आहार, विहार, आचार आणि विचार ह्या कशातही शिस्त नसलेला हा माणूस शिस्तबद्ध योग कसा समजून घेणार होता? परंपरागत योग शिकवण्याच्या पद्धतीला फाटा देत काहीतरी नवीन पद्धत वापरणे गरजेचे होते. त्यातूनच ग्रामीण योग प्रकल्पांची निर्मिती झाली. मुलांसाठी योग बाल विकास वर्ग, शेतकरी महिला व पुरुषांसाठी ग्रामीण योग केंद्र व वृद्धांसाठी वानप्रस्थाश्रम असे तीन योग प्रकल्प गावात क्रमाने उभे राहिले. त्यासाठी माझेच गाव म्हणजे तळेघर हे गाव निवडले. ज्ञानाचा गंध नसलेला सामान्य माणसाला पहिल्यांदाच अध्यात्मातील यमनियम समजले. वेगवेगळ्या धार्मिक पंथातून ऐकलेल्या संकल्पना त्यांना समजू लागल्या.
मंडणगड (शहरात) गृहस्थिंसाठी regular yoga classes व योग शिबिरांचे आयोजन सुरू केले. योग शिकवण्याची पद्धत, theory आणि practical अशी दोन्ही पद्धतीची असल्याने लोकांना एक वेगळेपण जाणवला. आनंद विहार आश्रमाने सामान्य गृहास्थिला तेही कोकणातल्या, एक विशिष्ट शिक्षण प्रणाली तयार केली आहे. योगाचे शास्त्रीय स्वरूप नीट समजावे व त्यांचा योगाभ्यास योग्य दिशेने जाण्यासाठी इथे योगासनांसोबतच यम – नियमांचे शिक्षण दिले जाते. गेल्या १५ वर्षात आश्रमातून अनेक चांगले योग साधक तयार झाले. आज ते आपला संसार सुखाने व समाधानाने करीत आहेत.
पोट भरण्यासाठी नवीन पिढी शहरात गेल्याने त्यांच्या आईवडिलांची समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी वानप्रस्थाश्रम ह्या योग प्रकल्पाची निर्मिती २००७ साली केली. पन्नाशीनंतरच्या वैराग्य युक्त जीवनाचे शिक्षण ह्या प्रकल्पात दिले जाते. हा प्रकल्प तळेघर ह्या गावी चालू आहे. आई वडिलांना गावाकडे सोडून गेलेले वृद्ध ह्या वानप्रस्थाश्रमात शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद घेत आहेत. योग सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचा योगेंद्रजींचे हेच स्वप्न असावे असे मला वाटते.
आनंद विहार आश्रम ही नोंदणीकृत रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव योग संस्था आहे. सध्या मंडणगड, संगमेश्वर व देवरूख या ठिकाणी संस्थेचे करू चालू आहे.
श्री दिनेश पां. पेडणेकर
संस्थापक व संचालक
आनंद विहार योगाश्रम तळेघर, मंडणगड.
