‘एमएमआरडीए’कडून उड्डाणपुलाचे काम थांबवण्याच्या सूचना; कल्याण स्थानक`कोंडीचे स्थानक’ ?…

Spread the love

कल्याण स्थानकात उड्डाणपुलाचे काम मेट्रोमुळे थांबले आहे. नेताजी सुभाष चौकात मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. मेट्रो मार्ग निश्चित होईपर्यंत उड्डाणपूल थांबवण्याचे आदेश आहेत. यामुळे कल्याण स्थानकात कोंडी वाढण्याची शक्यता आहे. मेट्रोमुळे स्थानक ‘कोंडीचे स्थानक’ बनण्याची भीती आहे….

कल्याण /ठाणे : कल्याण स्थानक परिसरात होत असलेली घुसमट कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना मेट्रोच्या प्रस्तावाने ब्रेक लागला आहे. नव्या मेट्रो ५ आणि मेट्रो १२चे संयुक्त स्थानक नेताजी सुभाष चौकात प्रस्तवित करण्यात आले असून, यासाठी मेट्रो १२ कल्याण स्थानकाजवळून जात असून, हा मार्ग निश्चित होईपर्यंत उड्डाणपुलाचे काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याने कल्याण स्थानक परिसरातील कोंडीत भर पडली आहे. तर कल्याण स्थानकातच दोन्ही मेट्रोचे महत्त्वाचे स्थानक तयार केले जाणार आहे. मध्य रेल्वेचे जंक्शन असलेल्या हे स्थानक यामुळे ‘कोंडीचे स्थानक’ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण हा बदलण्यात आलेला मेट्रो ५चा मार्ग दुर्गाडी चौकातून खडकपाडा, प्रेम ऑटोमार्गे सुभाष चौकातून विठ्ठलवाडीमार्गे उल्हासनगरकडे जाणार आहे. तर नवी मुंबईकडून येणारी मेट्रो १२ कल्याणच्या गुरुदेव चौकातून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वळून बाजारपेठेतून महात्मा फुले चौकमार्गे सुभाष चौकात मेट्रो ५ला जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गाची मंगळवारी ‘ एमएमआरडीए ‘च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

सध्या कल्याण स्थानकात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हा उड्डाणपूल जुन्या पादचारी पुलावरून उभारला जात आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामासाठी पादचारी पूल तोडण्यात आले असून, आतापर्यंत उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने स्थानक परिसराची अवस्था दयनीय झाली आहे.

स्टेशन परिसरात पसरलेला चिखल, उड्डाणपुलाच्या कामामुळे जागोजागी ठेवलेले साहित्य, खोदकामामुळे झालेला चिखल, फेरीवाले आणि हजारोच्या संख्येने वावरणारे बेशिस्त शिस्त रिक्षाचालक, दिवसारात्री नागरिकांसाठी भयभीत वातावरण निर्माण करणारे गर्दुल्ले, चरशी आणि वारांगना यामुळे स्थानक परिसरात वावरताना नागरिकांना जागोजागी बकालपणाचा अनुभव सहन करावा लागतो.

कल्याण स्थानकात पोचण्यासाठी प्रवाशांना रस्ता ओलांडताना आडव्या तिडव्या उभ्या केलेल्या रिक्षा, उड्डाण पुलाच्या कामासाठी रस्त्यात ठेवलेली सामग्री यासारखा अडथळा पार करण्याचे मोठे दिव्य सहन करावे लागते. त्यातच बाहेरून येणाऱ्या एसटी बसेस प्रवाशांना सोडण्यासाठी बस स्थानकात येत असल्यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम नेताजी सुभाष चौक, महातामा फुले चौकापासून येणाऱ्या रस्त्यावर, बैलबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर, गुरुदेव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरू असल्याने स्थानकात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी असलेले तिन्ही बाजूचे रस्ते कोंडीने ग्रासले आहेत.

तर छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून दीपक हॉटेलकडे येणारा रस्ताच वाहतुकीसाठी मोकळा आहे. मात्र आता याच रस्त्यावर देखील मेट्रोचे काम सुरू केले जाणार असल्याने पिलर उभे करण्यासाठी आधीच अरुंद (९ मिटर) असलेल्या रस्त्यावरील वाहतूक पूणर्पणे बंद करावी लागण्याची भीती आहे. यामुळे नागरिकाकडून मेट्रो १२ गुरुदेव चौकातूनच वळवली जावी, अशी मागणी होत आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page