
देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले.
मुंबई-गोवा हायवे जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
*मुंबई :* मुंबई-गोवा रस्त्याच्या कामात भरपूर अडचणी आल्या. हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जूनअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दादरच्या अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते.
देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल. चीनमध्ये लॉजिस्टिक कॉस्ट ८ टक्के आहे. युरोपातील देशांत ११ टक्के आहे. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट सध्याच्या दोन अंकी म्हणजेच जवळपास १६ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर येत्या जानेवारीपर्यंत आणली जाईल, असे गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी पुढील दोन वर्षात नॅशनल हायवेचे रस्ते जाळे अमेरिकेपेक्षा चांगले होईल, असा आशावाद व्यक्त केला.
नवी मुंबई विमानतळाकडे वॉटर टॅक्सी जाणार…
मुंबईमधील कोणत्याही दिशेकडून जलमार्गाने १७मिनिटात नवी मुंबई विमानतळाकडे जाता यावे यासाठी वॉटर टॅक्सीची योजना तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
वसई विरारपासून ते गेटवे ऑफ इंडिया या कोणत्याही ठिकाणाहून या नवी मुंबई विमानतळाकडे जाता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
तसेच वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी नवे १०८ जलमार्ग तयार केले जाणार असून, त्यातील दोन जलमार्ग सुरू झाले आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.
१५ दिवसांत टोलचे नवे धोरण..
‘एनएचएआय’च्या टोलनाक्यांबाबत पुढील पंधरा दिवसांत नवे धोरण आणले जाणार आहे. त्यातून या टोलनाक्यांबाबत वाहनचालकांची कोणतीही तक्रार राहणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.
तसेच भविष्यात सॅटेलाइट बेस टोलवसुली केली जाणार असून त्यातून नागरिकांना टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही, असेही गडकरी म्हणाले.
अटल सेतूवरून बंगळुरूपर्यंत महामार्ग..
अटल सेतूपासून पुण्याच्या रिंग रोडपर्यंत जाणारा नवा महामार्ग उभारला जाणार आहे. हा महामार्ग पुणे-मुंबई एक्सप्रेसपेक्षा रुंदीने तीन पट असेल. पुढे पुण्यापासून बंगळुरुपर्यंत नवा मार्ग उभारला जात आहे. त्यामुळे मुंबईपासून बंगळुरुला ५ तासांत जाता येईल.