नेरळ: सुमित क्षीरसागर
नेरळ शहराला आजूबाजूची अनेक गावे जोडलेली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांना नेरळ बाजारपेठ ही जवळची असल्याने त्याची नेरळ शहरात ये-जा सुरू असते. यासाठी प्रवासी वाहतूक नेरळ येथून सुरू असते. मात्र यात परिवहन विभागाचे नियम पाळत काळ्या पिवळ्या टॅक्सी व्यतिरिक्त खाजगी विनापरवाना वाहतूक देखील केली जाते. याचा फटका परिवहन विभागाचे नियम पाळत काळ्या पिवळ्या टॅक्सी यांना बसत आहे. प्रशासनाला या टॅक्सी मालकांनी तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याने टॅक्सी संघटना आक्रमक झाली आहे.
नेरळ येथील अष्टविनायक टॅक्सी चालक-मालक संघटनेने आज १ मे महाराष्ट्र दिनी नेरळ साई मंदिर चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. खाजगी विनापरवाना प्रवासी वाहतूक करणारी वाहने बंद करा अशी मागणी त्यांनी केली आहे. आपली मागणी पूर्ण होईपर्यंत आता माघार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
नेरळ हे तालुक्यातील कर्जत नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या नेरळला आजूबाजूची ५० पेक्षा अधिक गावे जोडलेली आहेत. नेरळ-कळंब, खांडस-कशेळे, कशेळे-नेरळ, नेरळ-गुडवन, नेरळ -पिंपळोली, नेरळ-कळंब-वांगणी अशी दिवसभर वाहतून नेरळवरून सुरू असते. यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस आहेत. मात्र मर्यादित वेळ आणि मर्यादित वाहतूक यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीचा आसरा प्रवाशांना घ्यायला लागतो. यामुळे स्थानिक चालकांना देखील रोजगार उपलब्ध होत असतो. तेव्हा स्थानिक तरुणांनी या व्यवसायासाठी काळ्या पिवळ्या टॅक्सी विकत घेत प्रवासी वाहतूक सुरू केली.
यासाठी त्यांना शासनाचा टॅक्स, गाडीचे हप्ते, परवाना रक्कम, आणि त्यांनतर प्रपंचाचा गाडा हाकणे अशी मोठी तारेवरची कसरत करावी लागते. अशात या चालकांसमोर मोठा प्रश्न उभा आहे तो खाजगी विनापरवाना इको कार हे करत असलेली प्रवासी वाहतूक. शासनाचे नियम पाळत टॅक्सी चालक मालक आपला उदरनिर्वाह करत असताना खाजगी विनापरवाना प्रवासी वाहतूक होत असल्याने काळ्या पिवळ्या टॅक्सीना प्रवासी मिळत नाही. त्यातच या इको चालक मालकांची अरेरावी असल्याने प्रवासी वाहतूक करणे जिकरीचे बनले आहे. तेव्हा नेरळ येथील श्री. अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संघटनेने याबाबत २०१९ पासून आवाज उठवला. परिवहन विभागापासून स्थानिक प्रशासन सर्वांना याबाबत तक्रार केली मात्र सर्वांनी साफ दुर्लक्ष केल्याने आता टॅक्सी संघटना आक्रमक झाली आहे.
नेरळ भागातील बस स्टॅन्ड जवळ टॅक्सी स्टॅन्ड काळ्या पिवळ्या श्री अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संस्था यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांना २१ फेब्रुवारी रोजी उपोषणाबाबत निवेदन सादर केले होते. १ मे रोजी महाराष्ट्र निमित्त पासून बेमुद साखळी उपोषण करणार असल्याचे त्या अर्जात नमूद केले होते. त्यानुसार टॅक्सी संघटनेने आजपासून नेरळ येथील साई मंदिर चौकट साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
या निवेदनामध्ये उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या ठेवल्या होत्या त्यानुसार अनधिकृत बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करण्याचा खाजगी गाड्या इको कार बंद करण्यात यावे, नेरळ इथून कळंब व कळंब इथून नेरळ अशी दुहेरी वाहतूक प्रवासी सेवा देण्यासाठी खाजगी ईको कार धारक अडथळे देत आहेत हे सुरळीत चालवण्यासाठी आरटीओ आणि पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करावे, परवानाधारक काळ्या पिवळ्या टॅक्सी मालक चालकांना खाजगी इको कार चालकाकडून सातत्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात येते त्याच्या विरोधात दंडत्मक व फौजीदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, नेरळ कळंब राज्य महामार्ग 109 संपूर्ण पावसाळापूर्वी संपूर्ण डांबरीकरण व सिमेंट काँक्रेट करण्यात यावा, काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात यावे अशी मागणी घेऊन टॅक्सी चालक यांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन सुरू केले आहे.
श्री अष्टविनायक टॅक्सी चालक-मालक संस्थाचे अध्यक्ष संतोष शिवराम भोईर, स्टॅन्ड अध्यक्ष केशव बबन तरे, उपाध्यक्ष रमेश विरले, सचिव संजय डबरे, खजिनदार रवींद्र विरले, विलास शिंगटे, नंदा शिंगटे, प्रशांत राहणे, शरद घारे, यशवंत तरे, भालचंद्र कडाव, रामू डबरे, भूषण वेहले, आत्माराम राणे, मयूर झिटे, नामदेव राहणे, निलेश गायकवाड, जीवन राणे हे या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.
दरम्यान आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आता माघार घेणार नाही अशी भूमिका टॅक्सी चालक मालक यांनी घेतली आहे. तर आजवर तोंडी आश्वासन यापलीकडे आम्हाला काहीच मिळाले नाही त्यामुळे या खाजगी विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ईको कार चालकांवर प्रश्नाकडे कारवाईचा क देखील उच्चारला गेला नाही त्यामुळे आता थेट प्रशासनाने भूमिका घेण्याची आम्ही वाट पाहत असल्याचे टॅक्सी संघटनेने सांगितले आहे. तेव्हा आता परिवहन विभाग आणि प्रशासन टॅक्सी चालक मालकांना न्याय देणार का ? आणि कधी हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.