संगमेश्वर | मे ३१, २०२३.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तेजोमय व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात ‘वीर गौरव दिवस’ म्हणून साजरी करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारने घोषित केले. या घोषणेला संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना देऊन त्यांच्या क्रांतीकार्याचा गौरव करण्यात आला.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक ग्रामपंचायतीत ग्रा.पं. सदस्या सौ. नुपुरा मुळ्ये यांच्या पुढाकाराने स्थानिक महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण शिबीर राबवण्यात आले. यासाठी भाजपा संगमेश्वर महिला आघाडी आणि ग्रामपंचायत आंबेड बुद्रुक यांनी सहकार्य केले. या शिबिरात राज फाऊंडेशन दापोली, जालगावचे श्री. संतोष गाठे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. फिनेल, मेणबत्त्या, अगरबत्ती यांसारखी अनेक उत्पादने बनवण्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले.
या शिबिराला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला. नव्वद महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला शिवाय येत्या काळात असाच मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम राबवल्यास उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. उद्योजकता वाढ आणि विकास या तत्त्वावर केंद्र शासन काम करत असून स्थानिक महिलांनी यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. कोमलताई रहाटे यांनी केले. केंद्रशासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. ज्या ग्रामस्थांनी अद्यापही केंद्रशासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसेल त्यांनी सरपंच उपसरपंच यांच्याशी त्वरित संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. कोमलताई रहाटे यांचेसोबत तालुका उपाध्यक्षा सौ. शीतलताई दिंडे, गावचे खोत व रा.स्व. संघाचे मंडल प्रमुख श्री. उन्मेषजी मुळ्ये, श्री. रविंद्रजी मुळ्ये, भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख श्री. राजेशजी आंबेकर, ग्रामपंचायत आंबेड बुद्रुकचे मा. सरपंच श्री. सुहासजी मायंगडे, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा महिला मोर्चा तालुका सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा बुथ अध्यक्ष श्री. राकेश गुरव व संपूर्ण बुथ कमिटीने मेहनत घेतली.