माभळे काष्टेवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रतिपादन.
संगमेश्वर दि 27( मकरंद सुर्वे)
▪️ कोकणच्या लाल मातीतून कबड्डीमध्ये कौशल्य असणारे खेळाडू घडावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रो-कबड्डीसारख्या भव्य स्पर्धा कोकणामध्ये आयोजित करण्यात याव्यात; त्यासाठी लागणारे सहकार्य देण्यास मी तयार आहे. रत्नागिरीमध्ये क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणेच ‘कबड्डी चॅम्पियन्स लीग’ भरविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
▪️ माघी गणेशोत्सवानिमित्त माभळे काष्टेवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. नवतरुण मित्र मंडळाच्यावतीने श्री. सुरेश जोशी यांच्या हस्ते आमदार उदय सामंत यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सदस्या सौ. माधवीताई गीते, श्री. बापू म्हाप, श्री. देसाई, श्री. मनोहर गीते, श्री. संदीप रहाटे, श्री. संजय कदम, श्री. संजय खातू, श्री. जमूरत अलजी, श्री. कैस मालगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
▪️ नवतरुण मित्र मंडळ माभळे काष्टेवाडीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत वाघजाई कोळकेवाडी संघ विजेता ठरला. विजेत्या संघास पारितोषिक स्वरुपात रोख रक्कम रुपये ३० हजार आणि झळाळता चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर उपविजेत्या नाना मयेकर फाउंडेशन, मालगुंड संघाला रोख रक्कम रुपये २० हजार आणि चषक प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त उपांत्य फेरीत पोचलेले अन्य दोन संघ अनुक्रमे तृतीय सोल्जाई देवरुख व चतुर्थ जुगाई कोसुंब या संघांना रोख रक्कम प्रत्येकी ७ हजार प्रदान करण्यात आले. तर उत्कृष्ट चढाई, सामनावीर असे अन्य पुरस्कार प्रदान करून खेळाडूंचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमादरम्यान माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील इयत्ता पाहिली ते १२ वी पर्यंत अध्ययन करीत असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.