रत्नागिरी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे इमारतीमधून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. हेच शिक्षक मुलांना घडवत असतात. या इमारतीमधून पुढची पिढी घडणार आहे त्यामुळे या इमारतीला फार महत्व आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
काजरघाटी धार, कुवारबाव येथे उद्योगमंत्री श्री. सांमत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण आणि फित कापून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उद्योगमंत्र्यांनी यावेळी इमारतीमधील दालनांची पाहणी केली. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, बाबू म्हाप, राजन शेट्ये, संस्थेचे माजी प्राचार्य श्री. भागवत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यामध्ये 1 ली ते 12 वी पर्यंत जे विद्यार्थी शिकतात, त्यांना जे शिकवतात, त्यांच्या प्रशिक्षणासाठी ही इमारत उभी केली आहे. त्यामुळे या इमारतीला फार महत्त्व आहे, कारण या इमारतीमधूनच नवी पिढी घडविण्याचे काम होत आहे. इमारतीला सभागृह आवश्यक आहे, असे संस्थेकडून सांगितल्यानंतर श्री.सामंत यांनी हॉलसाठी 80 लाख रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. या इमारतीच्या समोर अतिशय चांगलं मैदान आहे, त्या मैदानालाही चांगलं रुप देता येईल. भविष्यात येथे विद्यार्थी आले तरी, त्यांच्यासमोर शिक्षकांना प्रशिक्षण देणारी संस्था अतिशय चांगली आणि स्वच्छ आहे, हे चित्र असेल.
ते पुढे म्हणाले, चांगल्या प्रकारे इमारती बांधण्यात येतात, पण त्या टिकविण्याची जबाबदारी देखील आपली सर्वांची आहे. इमारती स्वच्छ आणि सुंदर असल्या पाहिजेत. अस्वच्छता, दुर्गंधी याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. हे आपण लक्षात घेणे गरजेच आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी सात कलमी कार्यक्रम कालच जाहीर केला आहे. सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात जोरदार पध्दतीने करु आणि सर्वात चांगला जिल्हा महाराष्ट्रात ठेवू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आली. प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य श्री. शिवलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राहूल बर्वे यांनी केले.