नवी दिल्ली- कोरोना साथीनंतर लसीकरणाबाबत ठाम भूमिका घेऊन त्यामध्ये सुधारणा केलेल्या ५५ देशांपैकी तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. यासाठी युनिसेफने भारताचे कौतुक केले आहे.
युनिसेफने प्रकाशित केला अहवाल
कोरोनाकाळात भारतामध्ये लशीची एकही मात्रा न घेतलेल्या मुलांची संख्या ३० लाखांपर्यंत वाढली होती. पण लसीकरणाप्रती बांधिलकी आणि सातत्य यामुळे भारत अशा मुलांची संख्या २७ लाखांपर्यत खाली आणू शकला, असे युनिसेफने म्हटले आहे. मिशन इंद्रधनुष्य आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवांद्वारे सरकारने सुरू केलेल्या मोहिमांमुळे हे शक्य होऊ शकले असे युनिसेफचे आरोग्य विशेषज्ञ विवेक वीरेंद्र सिंग म्हणाले.
लसीकरणाचा ‘द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन २०२३’ या वार्षिक अहवालात युनिसेफने अभ्यास केलेल्या ५५ पैकी ५२ देशांमध्ये कोरोनादरम्यान मुलांचे लसीकरण करण्याबाबतची धारणा कमी झालेली आहे. कोरोना काळानंतर घाना, सेनेगल, पापुआ न्यू गिनी आणि जपानमध्ये एक तृतीयांशपेक्षा अधिक मुलांमध्ये लसीकरणाबाबतचा आग्रह कमी झाला असल्याचे या अहवालात म्हणटले आहे.
द व्हॅकसिन कॉन्फिडन्स प्रोजेक्टद्वारे केलेल्या एका अहवालानुसार चीन, भारत, आणि मेक्सिको या तीनच देशांमध्ये लसीकरणाबाबतची समज वाढली आहे. हा अहवाल युनिसेफ प्रकाशित केला आहे.