
११ मे/नवी दिल्ली– भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीच्या द़ृष्टीने दिलासादायक असून आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाला गती देण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नोंदविले आहे.
नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक पाहणी अहवाल (वर्ल्ड इकॉनॉमी आऊटलूक रिपोर्ट) नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 5.9 टक्क्यांच्या गतीने वाढेल, असे निरीक्षण नोंदविण्यात आले असून भारताच्या या उल्लेखनीय प्रगतीला देशाने अवलंबिलेले डिजिटलायजेशन कारणीभूत ठरले आहे. तसेच कोरोनानंतर गती खुंटलेल्या भारताला तत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकारची धोरणेही उपयुक्त ठरल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
नाणेनिधीच्या या अहवालानुसार सध्याच्या जगाच्या अर्थव्यवस्थेची गती 2.8 टक्क्यांवर आहे. 2024 मध्ये ही गती 3 टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज आहे.
नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा यांच्या म्हणण्यानुसार, भारत हा गेले काही महिने जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर एक तेजस्वी किरण बनून राहिला आहे आणि जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत भारताचा 15 टक्के इतका हिस्सा आहे. भारताने आपल्या विकासाचा दर मार्च 2023 अखेर 7.8 टक्क्यांवर राखून ठेवला तर चालू आर्थिक वर्षात हा विकास दर 6.1टक्क्यांवर राहील, असा अंदाज आहे.