कँडी- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आशिया चषकातील भारताचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला आहे. १० वाजेपर्यंत पंचांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली. पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे अखेर पंचांनी सामना रद्द म्हणून जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण दिले. पाकिस्तान संघाने नेपाळचा पराभव करत दोन गुणांची कमाई केली होती. पाकिस्तान संघाने तीन गुणांसह आता सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर २६७ धावांचे आव्हान दिले होते. पण पावसामुळे रंगाचा बेरंग झाला अन् सामना रद्द करावा लागला. आता भारताकडे एक गुण झाला आहे. सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळविरोधात विजय अनिवार्य आहे. भारतीय संघाने नेपाळचा पराभव केला अथवा पावसामुळे सामना रद्द झाला तरच भारताचे आशिया चषकातील आव्हान कायम राहणार आहे. नेपाळने जर भारताचा पराभव केला तर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
डकवर्थ लुईस नियमांनुसार, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघामध्ये कमीत कमी 20-20 षटकांचा सामना व्हावा लागतो. 20 षटकांच्या खेळासाठी 10.27 इतकी वेळ होती. पण कँडी येथील सध्याची स्थिती पाहता पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाही. तासभरापासून कँडीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस जरी थांबला तरी खेळपट्टी आणि मैदान तयार करण्यासाठी 40-45 मिनिंटे इतका वेळ लागेल. त्यामुळे पंचांनी दोन्ही कर्णधारांशी चर्चा करुन सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता भारताचा पुढील सामना नेपाळसोबत होणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे.
पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. भारतीय संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. शहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी भारताच्या दहा फलंदाजांना तंबूत धाडले. भारतीय संघाने 48.5 षटकात 266 धावांपर्यंत मजल मारली. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. इशान किशन याने 82 तर हार्दिक पांड्याने 87 धावांची खेळी केली.