वीस वर्षानंतर टीम इंडियाने विश्वचषकामध्ये न्यूझीलंडला पाजले पाणी..
विश्वचषक २०२३ मध्ये भारतानं सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियानं धर्मशालामध्ये खेळलेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
धर्मशाला- धर्मशालामध्ये आज (२२ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर ४ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विश्वचषकातील भारताचा हा सलग पाचवा विजय आहे.
डॅरेल मिशेलचं शानदार शतक :
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. फार्मात असलेला सलामीवीर डेव्हॉन कॉनवे शून्यावर परतला. त्याला सिराजनं बाद केलं. दुसरा सलामीवीर यंगही १७ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या रचिन रवींद्र आणि डॅरेल मिशेलनं भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. रवींद्रनं ८७ चेंडूत ७५ धावा कुटल्या. तर मिशेलनं शानदार शतक ठोकलं. त्यानं १२७ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं १३० धावा केल्या.
मोहम्मद शमीचे ५ बळी :
हे दोघं बाद झाल्यानंतर मात्र न्यूझीलंडचा डाव गडगडला. त्यांच्या खालच्या फळीतील एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकले नाही. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ५० षटकांत २७३ धावा करून बाद झाला. भारताकडून या विश्वचषकात प्रथमच खेळणाऱ्या मोहम्मद शमीनं धारदार गोलंदाजी केली. त्यानं १० षटकांत ५४ धावा देत ५ बळी घेतले. यासह या विश्वचषकात भारताकडून एका सामन्यात ५ विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.
भारतीय ओपनर्सची धडाक्यात सुरुवात :
न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी धडाक्यानं सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आपल्या नेहमीच्या फॉर्ममध्ये दिसला. त्यानं ४० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ४६ धावा ठोकल्या. तर शुभमन गिल २६ धावा करून परतला. यानंतर आलेल्या विराट कोहलीनं एका टोकानं किल्ला लढवून ठेवला. त्याला श्रेयस अय्यरनं उत्तम साथ दिली. अय्यर ३३ धावांवर बाद झाल्यानंतर राहुल मैदानात आला. तो २७ धावा करून परतला.
कोहलीचं शतक हुकलं :
त्यानंतर विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळत असलेला सूर्यकुमार यादर क्रिजवर आला. मात्र आपल्या पहिल्या सामन्यात तो काही कमाल दाखवू शकला नाही. तो ४ चेंडूत २ धावा करून परतला. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर क्रिजवर आलेल्या रविंद्र जडेजानं कोणतीही रिस्क घेतली नाही. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्यानं ४४ चेंडूत ३९ धावा नोंदवल्या. विराट कोहलीचं या विश्वचषकातील सलग दुसरं शतक अवघ्या ५ धावांनी हुकलं. तो १०४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ९५ धावा करून बाद झाला.