भारत-श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक जाहीर; ‘गंभीर’ युगाला होणार सुरुवात, कधी होणार सामने?

Spread the love

*झिम्बाब्वे दौऱ्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. तिथं त्यांना 3 सामन्यांची टी 20 आणि नंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.*

*भारत-श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक जाहीर*

*मुंबई :* भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथं ते 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. यानंतर त्यांना श्रीलंका दौऱ्यावर जायचं आहे, तिथं त्यांना 3 सामन्यांची टी 20 आणि नंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी 20 विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेनंतरच राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) माजी सलामीवीर गौतम गंभीरची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

*🔹️गंभीरची सुरुवात श्रीलंका मालिकेपासून :*

या श्रीलंका दौऱ्यापासूनच गौतम गंभीर त्याच्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहे. 2024 च्या टी 20 विश्वचषकानंतर, युवा भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. तिथं दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. या आठवड्याच्या अखेरीस संघाची घोषणा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टी 20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडं सोपवलं जाऊ शकते. तर एकदिवसीयची कमान केएल राहुलकडे दिली जाऊ शकते. याचं कारण रोहित शर्माची विश्रांती असेल. रोहित या दौऱ्यातूनही विश्रांती घेऊ शक्यता आहे. तर विश्वचषकानंतर त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशा परिस्थितीत हार्दिक टी 20 आणि राहुल एकदिवसीयमध्ये कर्णधार होऊ शकतो.

*🔹️26 जुलैपासून दौऱ्याला सुरुवात :*

भारतीय संघ 26 जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात करेल. प्रथम, भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून पल्लेकेले इथं खेळवले जातील. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. या मालिकेतील सर्व एकदिवसीय सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं खेळवले जातील. 50-50 षटकांचे हे एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून खेळवले जातील.

*🔹️भारत-श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक :*

▪️26 जुलै – पहिला टी 20, पल्लेकेले
▪️27 जुलै – दुसरा टी 20, पल्लेकेले
▪️29 जुलै – तिसरा टी 20, पल्लेकेले
▪️1 ऑगस्ट- पहिला वनडे, कोलंबो
▪️4 ऑगस्ट- दुसरा वनडे, कोलंबो
▪️7 ऑगस्ट- तिसरा वनडे, कोलंबो

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page