न्यूझीलंडची २ षटकात ५ धावांवर ३ बाद अशी अवस्था.
जनशक्तीचा दबाव न्यूज | अहमदाबाद | फेब्रुवारी ०१, २०२३.
न्यूझीलंड विरूध्दच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सलामीवीर शुभमन गिल याने वनडे क्रिकेटमधील आपला फॉर्म कायम राखत टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले आहे. भारताने शुभमन गिलच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर २३४ धावा केल्या आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
पहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी करण्यात गिलला अपयश आले होते. मात्र, या सामन्यातील पहिल्या षटकापासून त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने ५४ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने २३४ धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली. मात्र न्यूझीलंड संघाचे २ षटकात केवळ ५ धावांवर ३ गडी बाद झाले आहेत.