न्यूयॉर्क- आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील २५ वा सामना भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर ८ मध्ये भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे.
भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भारताने बुधवारी अमेरिकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अमेरिकेने १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने १८.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने सुपर८ फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. विराट कोहली पहिल्याच षटकात गोल्डन डकचा बळी ठरला. तर तिसऱ्या षटकात रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अमेरिकेचा महत्त्वाचा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने या दोघांच्या विकेट्स आपल्या नावे केल्या.
भारताच्या विजयाचे हिरो ठरले सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे. भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांनी आधी भार सांभाळला. त्यानंतर पंत १८ धावांवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला सोबत घेतले आणि भारताला विजय गाठून दिला. सूर्यकुमार यादवने या सामन्यात अर्धशतक ठोकत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यादवने नाबाद ५० धावा ठोकल्या. दुसरीकडे गोलंदाजीत शिवम दुबे जरी चालला नसला तरी त्याने फलंदाजीतून दाखवून दिले की तो ही काही कमी नाही. त्याने नाबाद ३१ धावा केल्या. यूएसएने भारताला विजयासाठी संघर्ष करायला लावला.