


अहमदाबाद- भारतीय संघाने सलग आठव्यांदा पाकिस्तानचा वनडे विश्वचषकामध्ये पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्डकप २०२३ मध्ये झालेल्या लढतीत पाकिस्तानवर ७ विकेटनी विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. गोलंदाजांनी केलेली शानदार कामगिरी आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केलेल्या ८६ धावा हे भारताच्या विजयाची मुख्य वैशिष्टे ठरली.
या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकत गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगली सुरूवात केली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी शानदार कमबॅक केले. तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी ८२ धावांची भागिदारी वगळता पाकिस्तानच्या डावात फार भरीव योगदान कोणाला देता आले नाही. बाबरने ५० तर रिझवानने ४९ धावा केल्या. भारताच्या जलद आणि फिरकी गोलंदाजांनी केलेल्या आक्रमक माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव फक्त १९१ धावांवर संपुष्ठात आला.
विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली खरी पण २३ धावांवर सलामीवीर शुभमन गिल बाद झाला. गिलने १६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ५६ धावांची भागिदारी करून पाया भक्कम केला.
रोहित-विराट जोडी विजय मिळून देईल असे वाटत असताना विराट कोहली १६ धावांवर माघारी परतला. मात्र दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्माकडून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच होती. त्याने फक्त ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ज्यात ४ षटकारांचा समावेश होता. रोहितची विकेट गेल्यावर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी सामन्यात चांगली खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. केएल राहुलने या सामन्यात 19 धावा तर श्रेयस अय्यरने 53 धावा केल्या.
