नवी दिल्ली- गेल्या कित्येक वर्षांपासून भारत लोकसंख्येच्या यादीत जगातील दुसऱ्या स्थानावर आणि चीन पहिल्या स्थानावर होता. मात्र आता भारताने चीनला मागे टाकत बाजी मारली आहे. जगातील लोकसंख्येच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे. युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार भारतात चीनपेक्षा २० लाख लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे भारताची एकूण लोकसंख्या वाढत-वाढत १४० कोटींच्या पुढे गेली आहे. अशातच चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला आहे त्यामुळे त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात आली आहे.
सध्या भारताची लोकसंख्या १,४२८.६ दशलक्ष इतकी आहे. तर चीनची लोकसंख्या १,४२५.७ दशलक्ष इतकी आहे. म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये २.९ दशलक्ष इतका फरक आहे.
युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार १९५० पासून भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युनायटेड नेशन्सची स्थापना झाली आणि १९५० पासून त्यांनी लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार चीनची राजधानी आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर बीजिंगची लोकसंख्याही वाढण्याऐवजी कमी झाली आहे. कोरोना महामारीमध्ये झालेल्या नुकसानीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.