क्रीडा | 6 डिसेंबर 2024- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाची खडतर परीक्षा असणार आहे, कारण याआधी जेव्हा भारतीय संघ या मैदानावर डे-नाईट कसोटी खेळण्यासाठी आला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला 36 धावांवर ऑलआऊट केले होते. रोहित शर्मा आणि कंपनी कांगारूंकडून बदला घेण्यासाठी आतुर असेल.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने पुनरागमन केले आहे. नाणेफेकीदरम्यान त्याने मधल्या फळीत फलंदाजी करणार असल्याचे सांगितले. म्हणजे केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले. पण ॲडलेड कसोटीत पहिल्याच चेंडूवर जे घडले त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. भारताच्या पहिल्या डावातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल आऊट झाला. मिचेल स्टार्कने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टार्कचा चेंडू त्याच्या पॅडला लागला जो लेगस्टंपवर जात होता. डीआरएससाठी नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या राहुलशी तो बोलला, पण राहुलने डीआरएस घेण्यास नकार दिला. अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला. शुभमन गील आणि के एल यांच्यात 42 धावांची भागीदारी झाली आहे.