स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाची आणि रत्नागिरीची अस्मिता. – मा. आमदार बाळ माने.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | डिसेंबर ०८, २०२३.

कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. रत्नागिरीत आज भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी युवा अध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मा. आमदार तथा भाजपाचे रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळ माने यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध नोंदवला.

“स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान उल्लेखनीय आहे. रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी आहे. त्यामुळे त्यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या नेत्यांना आजच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही निर्वाणीचा इशारा देत आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरीतील कार्य अभ्यासकांना आजही प्रभावित करते तर केवळ काँग्रेसचे वाचाळवीर नेते मात्र आपल्या स्वार्थासाठी त्यांच्याविषयी अपप्रचार करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसजनांनी मा. मोदीजींची धास्ती घेतली आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा क्षुल्लक प्रयत्न सध्या त्यांचे नेते करत आहेत. काहीही असले तरी यापुढे आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दाखवलेल्या हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे जाऊन देशाला महासत्ता करणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी वेळेत स्वतःला आवर घालावा. अन्यथा यापुढे ठोशास ठोसा मिळेल हे ध्यानात ठेवावे.” असा गर्भित इशारा भाजपा नेते बाळासाहेब माने यांनी दिला.  

यावेळी युवा मोर्चा प्रदेश चिटणीस विक्रम जैन, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर, राजापूर (पश्चिम) महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. सुयोगा जठार, पदवीधर सेलचे जिल्हा संयोजक मनोज पाटणकर, व्यापारी आघाडीचे प्रमोदशेठ खेडेकर, संदीप (बाबू) सुर्वे, बापू गवाणकर, राजू महाकाळ, युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धाय मयेकर, युवा मोर्चा रत्नागिरी विधानसभा संयोजक निरंजन जठार, भाजयुमो जिल्हा चिटणीस सोहम खानविलकर व पमू पाटील, युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी अतिफ काझी, शिवानी दुदम, चिन्मय शेट्ये, गौरव जाधव यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.       

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page