
दापोली : उन्हवरे येथे पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे २० लाख रुपये निधीतून बांधण्यात आलेले शौचालय हे निकृष्ट दर्जाचे असून त्याचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे लेखी पत्र उन्हवरे ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला दिले असताना त्याच कामाचे पाटी लावून खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते उदघाटन करून घेतल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
उन्हवरे गरम पाणी कुंड हे पर्यटनदृष्ट्या मागासलेले असल्याने विकासाकरिता निधी प्राप्त व्हावा म्हणून तत्कालीन पंचायत समिती सदस्य व सरपंच यांनी सततचा पाठपुरावा करुन पर्यटन विकास योजनेंतर्गत कधी नव्हे तो एवढा निधी मंजूर करून घेतला. मात्र स्त्रियांच्या स्नानगृहाला सुस्थितीत दरवाजे नाहीत, कुंडाकडे जाणारी गरम पाण्याची लाईन फुटली आहे. अशा अनेक समस्या असताना पर्यटनाच्या नावाखाली गरज नसताना सर्वच निधी शौचालयाच्या इमारतीला वापरला गेला. आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तेही काम चांगले झाले नाही. त्यामुळे मागील ग्रामसभेत सदर विषय हाताळून चौकशीची मागणी केली असल्याचे पत्र ग्रामसभेत दाखवण्यात आले व त्याचा जलदगतीने पाठपुरावा व्हावा यासाठी आमसभेत पाठपुरावा करण्यात आला असे असताना स्थानिक प्रशासनच सदर कामाचा शुभारंभ करत असेल तर ती बाब गंभीर असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. व त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. सदरचे काम चांगले व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असतानाच ग्रामपंचायतीनेच खा. सुनिल तटकरे दापोली दौर्यावर आले असताना त्यांच्या हस्ते शौचालयाच्या कामाची पाटी लावून मोजक्या लोकांना सोबत घेवून उदघाटन करून घेतले.