रत्नागिरी, दि. 10: (जिमाका) – महिला बचत गट तथा विक्री केंद्राच्या इमारतीचा वापर उद्योग, उत्पादनाला बाजारपेठ मिळविण्यासाठी करावा, त्याचबरोबर महिलांसाठी कार्यशाळा, आरोग्य शिबीर घेण्यासाठीही करावा, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पावस येथे महिला बचत गट विक्री केंद्र तथा महिला बचतगट भवन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, सरपंच चेतना सामंत, उपसरपंच प्रविण शिंदे, माजी सभापती बाबू म्हाप आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते फित कापून आणि कोनशिला अनावरण करुन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, बचतगट भवनाची इमारत पूर्ण झाली याचा मला आनंद आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 17 तारखेला तुमच्या सर्वांच्या खात्यावर जमा होणार आहे. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहे, तोपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. जिल्ह्यातील 2 लाख 74 हजार 346 भगिनींच्या खात्यावर 82 कोटी 30 लाख 38 हजार जमा होणार आहेत. लेक लाडकी, तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, अन्नपूर्णा या योजनांचा लाभ देखील सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प संग्राम महिला प्रभाग संघाला मार्केटींग व्हॅन यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट महिला, प्रभाग संघाच्या सदास्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.