भांबेड जि.प. गटात भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न…

Spread the love

भांबेड, लांजा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा नेते श्री. निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

भांबेड, लांजा | फेब्रुवारी २६, २०२३

राजश्री तथा उल्काताई विश्वासराव यांच्या संकल्पनेतून भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी भांबेड जि.प. गटात भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी भाजपाचे स्थानिक तसेच जिल्हा पातळीवरील बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास असणारे नागरिक उपस्थित होते.

नूतन कार्यालयात निलेश राणे यांचे स्वागत करताना राजश्री (उल्का) विश्वासराव.

जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर निलेश राणे, उल्काताई विश्वासराव, तालुकाध्यक्ष महेश खामकर व अन्य मान्यवरांनी शिवप्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. यानंतर कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी सभागृह कार्यकर्त्यांनी पूर्णपणे भरले होते.

शेकडो ग्रामस्थांसहित उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश…

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर केवळ त्यांचे नेतेच नव्हेत तर कार्यकर्तेदेखील नाराज आहेत. येणार्‍या काळात गावातील आणि जिल्हा परिषद गटातील राजकीय परिस्थिती ओळखून उल्काताई विश्वासराव यांच्या विकासात्मक कार्यपद्धतीवर आणि सजग नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये भांबेड गावातील ९ वाड्यांचा कोळे बूथ, जो कालपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होता, आज मा. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी शाखाप्रमुख सचिन शिवगण, मुंबईस्थित श्री. अनंत शिवगण, कमलाकर शिवगण, रूपेश सोलकर, पंढरी मडवी, तुकाराम दैत, शंकर शिवगण, प्रकाश मडवी यांच्यासोबत जवळपास शंभरहून अधिक ग्रामस्थांनी भाजपा प्रवेश केला. यासाठी चेंबूरचे माजी नगरसेवक श्री. महादेव शिवगण यांनी योगदान दिले. हा उल्का विश्वासराव यांनी स्थानिक आमदार डॉ. राजन साळवी यांना दिलेला एक मोठा धक्का असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

उपस्थितांसमोर आपला विषय मांडताना तालुकाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर.

तालुकाध्यक्ष महेश ऊर्फ मुन्ना खामकर यांनी उपस्थितांना “जनसंपर्क कार्यालयाचे महत्त्व आणि त्यामाध्यमातून करावयाच्या सामाजिक उपक्रमांचा ऊहापोह केला. तसेच यावेळी या गटातील दोन्ही पंचायत समिती आणि जि.प. कमळावर लढून जिंकायच्या आहेत” असा वज्रनिर्धार उधृत केला.

उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मनोगत व्यक्त करताना राजश्री (उल्का) विश्वासराव…

यानंतर उल्काताई विश्वासराव यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. “जि.प . गटाचा कायापालट करणे हाच एकमेव उद्देश डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही गोष्टींना गांभीर्याने घेऊन त्यांना उत्तरे देण्यासाठी वेळ फुकट घालवणार नाही. या गटात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, नवउद्योजकांना प्रेरित करून त्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य व्यक्तींना मिळवून देणे या त्रिसूत्रीवर पुढील काळात कार्य करणार आहे. तुमच्यासारखे अजूनही लोक भविष्यात माझ्यासोबत जोडले जातील याबाबत मी निश्चिंत आहे.”

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी खासदार निलेश राणे…

निलेश राणेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत स्थानिक आमदार आणि खासदारांची कोंडी करत आम्ही उल्काताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा इशारा दिला. “राणे श्रेय घेऊन नाही तर कामे करून मोठे झाले आहेत. गेल्या साडेआठ वर्षांत लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची गळचेपी झाली असून यामाध्यमातून झालेले लोकांचे नुकसान पाहून आमचे मन हळहळते. मात्र यापुढे आमच्या शिवसेनेच्या साथीने या जोडगोळीला आम्ही बदलण्याचा निर्धार करून आलो आहोत. आम्हाला तुमची साथ हवी आहे. आमच्याकडे केंद्रात मोदी साहेबांसारखे व्रतस्थ नेतृत्व आहे तर राज्यात देवेंद्रजी खंबीरपणे आपल्या मागे उभे आहेत तरीदेखील आपण मागे रहाणार असू तर दोष कोणाला द्यायचा?” अशा कानपिचक्या यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.

कार्यकर्त्यांचा गौरव करताना निलेश राणे, उल्का विश्वासराव आणि महेश खामकर.

यानंतर कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संवाद करून निलेश राणे यांनी अडीअडचणी, समस्या समजून घेतल्या. निवेदने स्विकारली. तसेच जास्तीतजास्त कामे पूर्णत्वास नेण्याचे आश्वासनदेखील दिले. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस श्री. राजेश सावंत, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. मुकुंदराव जोशी, अनुसूचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. मारूती कांबळे, ओबीसी तालुकाध्यक्ष श्री. दादा भिडे, नगरसेवक, शहराध्यक्ष श्री. प्रमोद कुरूप, गटनेते लांजा श्री. संजय यादव, नगरसेवक अरविंद लांजेकर, तालुका उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, तालुका सरचिटणीस श्री. विराज हरमले, श्री. श्रीकांत ठाकूर देसाई, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते, भांबेड जि.प. गट युवा अध्यक्ष श्री. महेश गांगण, श्री. महेश इंदुलकर आदि पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page