डाँक्टरांनी जनसेवक म्हणून काम केले पाहिजे- पालकमंत्री उदय सामंत..
*देवरूख-* तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या रूग्णालयातून जनतेला आरोग्याच्या सर्व सेवा पुरवल्या जातात. त्यामुळे येथील डाँक्टरांनी जनसेवक म्हणून काम केले पाहिजे. डॉक्टरांविषयी जनमानसात अस्मिता निर्माण होणे गरजेचे आहे. देवरूख ग्रामीण रूग्णालयाची नूतन इमारत सुसज्ज असून ती आता जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. नागरिकांना सर्व उपचार आता या रूग्णालयातून मिळतील असा विश्वास व्यक्त करतानाच या रूग्णालयातून जनतेला चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाल्या पाहिजेत, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरूख येथे केले.
देवरूख ग्रामीण रूग्णालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा बुधवारी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, जिल्हा शासकीय रूग्णालयात ३२ डॉक्टर सेवा देत आहेत, त्यामुळे सर्जरींची संख्या वाढलेली आहे. देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी इमारत जशी स्वच्छ आहे. तशी कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी येथील कर्मचाऱ्यांची आहे. जनता डॉक्टरांकडे विश्वासाने बघत असते. ग्रामीण रुग्णालयात चांगले डॉक्टर देण्याची व्यवस्था लवकरच केली जाणार असून येथील रुग्णांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. त्याबरोबर अपंगांचे दाखले घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी बोलताना देवरूखमधील ग्रामीण रूग्णालय आता रुग्णांसाठी खुले होणार आहे. रूग्णालयात ज्या ज्या सेवा आवश्यक आहेत, त्या देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे सांगितले. ग्रामीण रुग्णालयात डायलेसीस युनिट, सोनोग्राफी मशीनची मागणी करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. अनिरूध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकीत्सक डाँ. भास्कर जगताप, डॉ. प्रल्हाद देवकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने, गटविकास अधिकारी भरत चौगुले, देवरूख नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते आदींसह रूग्णालयाचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.