भांबेड | फेब्रुवारी २५, २०२३.
आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि जनसंपर्क यांसोबतच केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भांबेड येथे भाजपा उद्योग आघाडी महिला समिती सहप्रमुख (कोकण विभाग) राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी भांबेड जिल्हा परिषद गट कार्यालय उभारण्यात आले आहे.
या कार्यालयाचे उद्घाटन भाजपा नेते, माजी खासदार, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. निलेश राणे यांच्या शुभहस्ते रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता संपन्न होणार आहे. यावेळी रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना राजश्री (उल्का) विश्वासराव म्हणाल्या, “राजकीय पक्षाचे कार्यलय हे केवळ राजकारण आणि निवडणुकीपुरते मर्यादित न रहाता लोकसेवेसाठी समर्पित असावे अशी माझी स्पष्ट धारणा आहे. केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. ‘त्याचा लाभ समाजातील अंतिम घटकाला मिळाला पाहिजे’ अंत्योदयाची विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी धीरोदात्तपणे पाऊले उचलणाऱ्या मोदी सरकारचे स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी म्हणून आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून सेवा देणार आहोत. यामध्ये जनतेच्या तक्रारी, समस्या, विद्यार्थी शिष्यवृत्ती, कृषी विषयक, रोजगार आणि व्यवसाय विषयक सहकार्य देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आमच्या क्षमतेनुसार देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
यानंतर कार्यकर्त्यांना आवाहन करताना भाजपा तालुकाध्यक्ष महेश (मुन्ना) खामकर म्हणाले, “आपल्या सर्वांसाठी हक्काचे कार्यालय असणे ही आत्यंतिक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी प्रदेश सचिव मा. निलेशजी राणे साहेब उद्घाटक म्हणून लाभणे हा दुग्धशर्करा योग. आता यामुळे आपली जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासाठीच आपल्याला योग्य मार्गदर्शन व्हावे आणि आपल्या काही समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी सकाळी ११:०० वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. तरी भांबेड जि.प. गटातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.”