मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हरियाणा, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हरियाणा सरकारने जिल्हा प्रशासनाला लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.केरळ सरकारने गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक आणि रुग्णांना मास्कची सक्ती केली आहे. केरळचे आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी राज्यातील कोविड-19 च्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी राज्यात मास्क सक्तीचा निर्णय घेतला. त्यासोबत आरोग्य विभागाला ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देशही दिले. तसंच त्यांनी लवकरच खासगी रुग्णालयांची विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे देखील सांगितले.
तर दुसरीकडे, पुडुचेरी सरकारने मास्कची सक्ती केली आहे. या सरकारने देखील सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केला आहे. यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत प्रशासनाने सांगितले की, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, दारुची दुकानं, हॉस्पिटॅलिटी आणि मनोरंजन क्षेत्र, सरकारी कार्यालये आणि व्यावसायिक कार्यालयांध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे सक्तीचे असेल.