
उत्तराखंड महाप्रलयात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. जळगावातील 16 पर्यटक तर बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.उत्तराखंड महाप्रलयात आंबेगाव तालुक्यातील पर्यटक अडकले.
जळगाव/पिंपरी-चिंचवड- उत्तराखंड महाप्रलयात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील अनेक पर्यटक हे उत्तराखंडला फिरायला गेले होते. मात्र, अचानक पावसाचा जोर वाढला आणि तेथील अनेक नद्यांना पूर आलाय. या महाप्रलयात राज्यातील पुणे, आंबेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, ठाणे यासह इतर भागातील अनेक पर्यटक अडकले आहेत. यातील अनेक पर्यटकांसोबत संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबानं दिली.
जळगावचे 16 प्रवासी बेपत्ता…
उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या धराली भागात ढगफुटी झाली. या प्रलयात बेपत्ता असलेल्या जळगाव जिल्ह्यातील 16 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही, अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. प्रसाद म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील 19 लोक उत्तरकाशीमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे, त्यापैकी तीन लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे. अद्याप १६ लोकांशी संपर्क झालेला नाही.”
सैन्याला पाहून बळ मिळालं…
उत्तरकाशी येथे अडकलेली जळगाव येथील आरोही मेहरा म्हणते, “हे सर्व घडले तेव्हा मला खूप भीती वाटली. येथील स्थानिक गावकऱ्यांनी आम्हाला खूप मदत केली. भारतीय सैन्यातील आमच्या जवानांना पाहून आम्हाला खूप बळ मिळालं.” जळगावचे अनेक पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत.

आंबेगाव तालुक्यातले पर्यंटक अडकले….
उत्तराखंड येथे ढगफुटीमुळे झालेल्या महाप्रलयात आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील 24 जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने कुटुंबीय व मित्रमंडळी चिंतेत आहेत.

महाराष्ट्र सरकारला विनंती…
अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयातील सन 1990 च्या इयत्ता दहावी बॅचच्या 24 वर्गमित्र व मैत्रिणींचा ग्रुप तीर्थयात्रेसाठी व फिरण्यासाठी उत्तराखंड येथे गेला होता. उत्तराखंड येथील घटना घडण्यापूर्वी यातील काही लोकांनी “आम्ही गंगोत्रीकडे निघालो आहोत” असा स्टेटस ठेवला होता. मात्र, हाच त्यांच्याकडून मिळालेला शेवटचा संदेश असून त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही संदेश मिळालेला नाही व त्यांना कोणताही संपर्क झाला नाही व होतही नाहीये. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळी काळजीत पडले असून, महाराष्ट्र सरकारने यात पुढाकार घ्यावा व आमच्या माणसांना सुखरूप घरी आणावे अशी मागणी केली आहे.
पर्यटकांसोबत संपर्क होत नाही…
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात वारंवार मुसळधार पाऊस व ढगफुटी सुरू आहे. या महाप्रलयात आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून 51 पर्यटक अडकल्याची माहिती मिळत आहे. खेड, मंचर, आंबेगाव तालुक्यामधील अवसरी गावातील तब्बल 24 पर्यटक या प्रलयात अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे या पर्यटकांचा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क झाला होता. परंतु, आत्ता या प्रलयानंतर त्यांचा कसलाही संपर्क होत नसल्याने नातेवाईक काळजीत पडले आहेत.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर