तुर्भे एमआयडीसीमध्ये भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, तीन कामगारांना वाचवण्यात यश
नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी येथील बी २२७ भूखंडावरील एका कंपनीत लागलेल्या आगीत दोन कामगारांचा धुरात गुदमरून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान लागलेली आगी विझवण्यासही संध्याकाळचे साडेचार वाजले होते, तर रात्रीपर्यंत कुलिंगचे काम सुरू होते. या प्रकरणी तपास सुरू असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच दोषी कोण आढळले, तर गुन्हा नोंदवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुर्भे एमआयडीसी येथील भूखंड क्रमांक बी २७२ येथे असलेल्या गेट मी. प्रा. लि. या कंपनीत अचानक आग लागली. सदर कंपनीत लहान मुलांच्या खेळण्या बनवल्या जात होत्या. तसेच डिजिटल खेळ असलेले कार्ड ही बनवले जात होते. आग लागल्या नंतर काही वेळातच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या; मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. घटनास्थळी आल्यावर कंपनीच्या गच्चीवर असलेल्या तीन कामगारांना वाचवण्यात आले. आगीपासून बचाव करण्यासाठी तिन्ही कामगार गच्चीवर गेले होते. आगीने कंपनीत असलेल्यांना बाहेर पडता येत नव्हते. कामगारांची सोडवणूक केल्यावर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आग विझल्यावर जेव्हा पाहणी केली त्यावेळी जितेंद्र शर्मा आणि सफी उल्लाह शेख या दोन कामगारांचे मृतदेह आढळले. या कामगारांना आगीमुळे बाहेर पडता येत नसावे आणि गच्चीवरही जाता आले नसावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनास्थळाची पूर्ण पाहणी करून अहवाल तयार करण्यात येईल, अशी माहिती अग्निशमन अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले, तर याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अहवाल आल्यावर त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी माहिती तुर्भे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.