
अकोला | विजयादशमीला रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे देशभर दहन केले जाते. मात्र महाराष्ट्रात एक गाव आहे, जिथे दसरा थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. खरं तर येथे रावणाची आरती केली जाते.
अकोला जिल्ह्यातील सांगोला गावातील अनेक रहिवाशांचा असा विश्वास आहे की, रावणाच्या आशीर्वादामुळे ते नोकरी करतात आणि उदरनिर्वाह करू शकतात. त्यांच्या गावात शांतता आणि आनंद रावणामुळे आहे.
रावणाच्या ‘बुद्धी आणि तपस्वी गुणांसाठी’ त्याची पूजा करण्याची परंपरा गेल्या ३०० वर्षांपासून गावात सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावाच्या मध्यभागी १० डोकी असलेली रावणाची उंच काळ्या पाषाणाची मूर्ती आहे.
स्थानिक रहिवासी भिवाजी ढाकरे यांनी सांगितले की, ग्रामस्थ रामाला तर मानतात, पण रावणालाही मानतात. म्हणूनच दसऱ्याला रावणाचा पुतळाही जाळला जात नाही.
स्थानिक लोकांनी सांगितले की, दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी देशभरातून लोक या छोट्या गावात लंकेच्या राजाची मूर्ती पाहण्यासाठी येतात आणि काहीजण तिची पूजाही करतात.