महाड- पहिल्याच पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथे दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरड कोसळल्यामुळे मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. महाड तालुक्यातील नांगलवाडी गावच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. पोलिसांकडून स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरड हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यापासून कोकणामुळे जोरदार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर, रत्नागिरीत मान्सून सक्रीय झाला आहे. पावसामुळं बळीराजा सुखावला. दुपारनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार एन्ट्री केली. पुढील चार दिवस रत्नागिरीसाठी आँरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. दुपारपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कुडाळ कॉलेज सर्कल भागात रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहनचालक आणि नागरीकांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. सध्या पावसाची संततधार सुरूच असून उद्याही मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.