*रत्नागिरी, दि. १८ ऑगस्ट 2024 – उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग व संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी निबे लि. यांच्यात आज सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत १ हजार कोटी गुंतवणूक करणार आहे. त्यातून सुमारे दीड हजार रोजगार निर्मिती होणार आहे.*
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात डिफेन्स प्रदर्शन कम सेमिनारचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, निवृत्त व्हायस ॲडमिरल सुनिल भोकरे, निबे कंपनीचे किशोर धारिया, बाळकृष्ण स्वामी, भावेश निबे, प्रकाश भामरे, निवृत्त कंमाडर सौरभ देव आदी उपस्थित होते.
*डिफेन्सशी निगडीत फार मोठा प्रकल्प रत्नागिरीत येणार*
पालकमंत्री श्री सामंत म्हणाले, महाराष्ट्रासाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. देशाच्या संरक्षणासाठी काय केले पाहिजे, हे सांगणारा आजचा कार्यक्रम आहे. निबे कंपनी रत्नागिरीमध्ये 1 हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. त्यामधून एक ते दीड हजार रोजगार निर्मिती होणार आहे. बंदूक हातात घेऊन सीमेवर राहूनच देशसेवा करता येते असे नाही, संरक्षण क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यातूनही देशाच्या संरक्षणाचे धडे मिळतात. हजारो नोकऱ्या मिळू शकतात, त्यातून देश सेवा घडू शकते. सैनिकांचा आदर सर्वांना असला पाहिजे. ते देशाच्या सीमेवर रक्षण करतात, म्हणून आपण शांतपणे झोपू शकतो, ही भावना सर्वांनी ठेवायला हवी. माजी सैनिकांचे देशाप्रती असणारे योगदान विसरुन चालणार नाही.असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हायला हवेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचे हेलिकॉप्टर नाशिकला तयार होते. रस विक्री करणारे निबेंनी डिफेन्सचे, महाराष्ट्राचे नाव जगावर नेले आहे. जी बंदूक परदेशातून 2 लाख 37 हजार रुपयांना आयात करायला लागायची, ती बंदूक निबेंनी मेक इन इंडियामध्ये केवळ 37 हजार रुपयांमध्ये तयार केली. अशा क्षेत्रात रत्नागिरीकरांनी सहभागी झाले पाहिजे. जिल्ह्यात राहूनच अशी प्रगती विशेषत: तरुणांनी करायला हवी. अजूनही एक फार मोठा डिफेन्सशी निगडीत प्रकल्प रत्नागिरीत येत आहे. 10 हजार नोकऱ्या द्यायच्या आहेत. जिल्ह्यातील युवकांनी मुंबईला न जाता जिल्ह्यातील अशा प्रकल्पात सामील व्हावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
*पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करा*
पोलीस भरतीमध्ये होमगार्डमधील 5 टक्के जागा असतात. पण, आपली मुले होमगार्ड व्हायला लाजतात. स्थानिकांनी याचा विचार करावा. स्थानिक मुलांनी पोलीस दलात भरती होण्यासाठी त्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिपीसीमधून निधी दिला जाईल. त्याचे नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना केली.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले , विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात आर्मीची शिस्त ठेवावी. कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर करताना मेहनत जरुर ठेवावी. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, कोकणामध्ये मुलांच्यात गुणवत्ता चांगली आहे. मुंबईला जाण्यापेक्षा पोलीस विभाग, संरक्षण क्षेत्राशी निगडीत क्षेत्रामध्ये करिअर करावे.
शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे फित कापून पालकमंत्री श्री. सामंत यांनी उद्घाटन केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महारांजाच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले.