
रत्नागिरी: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातील शस्त्रे असणार आहेत. ही आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे. हा शस्त्राचा कारखाना रत्नागिरीत सुरु होणार आहे. पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य अशा सर्वच बाबतीत रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर राहिला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा नेहमीच महाराष्ट्रात अग्रेसर राहील, असा शब्द पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला.
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आज 15 ऑगस्ट, भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन ! हा मंगलमय दिवस आज देशभर उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले आणि त्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले, अशा सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना याप्रसंगी मी अभिवादन करतो. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्कराच्या हातात भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातील शस्त्रे असणार आहेत. ही आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे. या कारखान्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून जमिनीचे संपादन सुरु आहे. व्हीआयटी सेमी कंडक्टरचा भव्य प्रकल्प रत्नागिरीत काही दिवसात सुरु होणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जागा एमआयडीसीने व्हीआयटी सेमीकंडक्टरला प्रदान केली आहे.
आपत्तीच्या प्रसंगामध्ये जिल्हा प्रशासनाची तयारीदेखील अतिशय चांगल्या पध्दतीने असते. एनडीआरएफ पथक असेल, संकटकालीन परिस्थितीत प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार, सेवाभावी संस्थादेखील अतिशय चांगल्या पध्दतीने काम करतात. त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांचेदेखील मनापासून कौतुक करतो आणि मनापासून धन्यवाद देतो. अमेरिकेतील नासा संस्थेला सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी भेट देण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदने देशात पहिल्यांदा सुरु केला. तीन वर्षात नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४६ आहे आणि १५० विद्यार्थी हे इस्त्रोला जाऊन आले आहेत. यामागचा उद्देश आपल्या जिल्ह्यातून एक तरी शास्त्रज्ञ निर्माण व्हावा आणि खऱ्या अर्थाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली व्हावी, या भावनेतून आज आपण हा उपक्रम राबवत आहोत.
ग्रामपंचायत कापडगाव, ग्रामपंचायत गोळप, गुहागर असेल याठिकाणी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून तयार होणारा १ मेगाव्हॅटचा वीज निर्मिती प्रकल्प, हा देखील महाराष्ट्रातला पहिलाच प्रकल्प आहे. आंबा बागायदार, काजू बागायतदार यांना देखील न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे. किसान सन्मान योजनेंतर्गत २० हप्त्यांचे वाटप शेतकऱ्यांना झाले आहे. ७०४ कोटी ३९ लाख रुपयांचे वितरण शासनामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. आंबा बागायतदारांसाठी सिंधुरत्न योजनेतून ९५ वाहनांची उपलब्धता साडेतीन लाख सबसिडीवर करुन देण्यात आली आहे.

युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले जाहीर झाले. त्यामधील एक किल्ला सुवर्णदुर्ग हा आपल्या जिल्ह्यातील किल्ला आहे. अकराही किल्ल्यांची देखभाल, दुरुस्ती करणे, पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करणं, यामध्ये रत्नदूर्ग किल्ल्याचाही समावेश करणे ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे. महिलांच्या आरोग्यासाठी कर्करोग तपासणी असेल, आरोग्य शिबिर ही सातत्याने आपल्या जिल्ह्यांमध्ये सुरु आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असेल, अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा अन्य शैक्षणिक सुविधा असतील त्या शासनामार्फत सरु करण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
आज पर्यटनाच्या दृष्टीने शिवसृष्टी, तारांगण, छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक पाहण्यासाठी रत्नागिरी शहरात लाखो पर्यटक येत आहेत. आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनमाध्ये अजून एक भर पडणार आहे, ती म्हणजे कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरील स्मारक ! यासाठी जो काही निधी लागेल तो देण्याचे आश्वासन महाराष्ट्र शासनाने दिले आहे. सर्वच बाबतीत रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर राहिला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर राहील, यासाठी प्रशासन, पालकमंत्री म्हणून मी स्वत: काम करेन, हा देखील शब्द देतो.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी ध्वजारोहणानंतर परेड पाहणी केली. यानंतर संचलनास प्रारंभ झाला. पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक १, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय पथक २, पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस महिला पथक, हवालदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बँड पथक, पलटन नाईक चंद्रकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा गृह रक्षक दल, पलटन नाईक मिनाक्षी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महिला गृह रक्षक दल, पोलीस उपनिरीक्षक किरण घाग यांच्या नेतृत्वाखाली श्वान पथक, जवाहर नवोदय विद्यालय पोलीस कॅडेट, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका यांचा संचलनात समावेश होता. राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कोळसंगे हे परेड कमांडर होते.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर