
दिवा/ ठाणे प्रतिनिधी- दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने आणि बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेला तब्बल ₹१०.२० कोटींचा पर्यावरणीय दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) आदेशानुसार आकारला आहे.
एनजीटीने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या निर्णयात दिवा डम्पिंग प्रकरणात पर्यावरणाची झालेली हानी अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार MPCB ने २ जुलै २०२५ रोजी ठाणे महापालिकेला पत्र पाठवून १ मे २०२४ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीतील पर्यावरणीय भरपाई म्हणून ₹१०.२० कोटींची रक्कम आकारली आहे. यापूर्वी २५ एप्रिल २०२४ रोजीच ₹९ कोटींचा प्राथमिक दंड निश्चित करण्यात आला होता.

१३ जून २०२५ रोजी MPCB कडून महापालिकेला सुनावणीची संधी देण्यात आली होती, मात्र महापालिकेकडून कोणीही हजर राहिल्याचा उल्लेख न करता ही रक्कम अंतिम करण्यात आली. हा निर्णय “Polluter Pays Principle” या धोरणावर आधारित असून, प्रदूषण करणाऱ्या संस्थेला जबाबदार धरून भरपाई घेण्याचा उद्देश आहे.

पर्यावरणीय परिणाम आणि जनतेचा संघर्ष…
२०१६ ते २०२३ या कालावधीत दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे सातत्याने बेकायदेशीर टाकण चालू होते. यामुळे परिसरातील जैवविविधता, खारफुटी, भूजल, आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. या संदर्भात वनशक्ती फाउंडेशनसह रोहिदास मुंडे व विविध पर्यावरण प्रेमी संस्था व स्थानिक नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे म्हणाले, “दिवा परिसरातील नागरिकांनी सात वर्षे हा लढा दिला. अखेर त्यांच्या आवाजाला राष्ट्रीय हरित लवाद व MPCB मार्फत न्याय मिळाला. ही कारवाई म्हणजे सामान्य जनतेच्या संघर्षाचा विजय आहे. यात वनशक्तीचे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांचे योगदान मोलाचे आहे.”
मुंडे यांनी यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “महापालिकेने पर्यावरणाचीच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्य व हक्कांचीही पायमल्ली केली आहे.”आताची आवश्यकता काय?डम्पिंग ग्राउंडमधील प्रदूषणामुळे स्थानिक लोकसंख्येला फुप्फुसाचे व त्वचारोग, पिण्याच्या पाण्याचे दूषित स्रोत, व जैवविविधतेचे नाश अशा अनेक गंभीर प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. परिणामी, आता या परिसराचे वैज्ञानिक पातळीवर पुनर्वसन, आरोग्य तपासणी शिबिरे, आणि प्रशासकीय उत्तरदायित्व ही निकड बनली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दिवा परिसरातील नागरिकांसोबत ठामपणे उभा असून, भविष्यातही पर्यावरण रक्षण व लोकहितासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार रोहिदास मुंडे यांनी केला.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर