
रत्नागिरी/ प्रतिनिधी- रत्नागिरीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात एक दुर्दैवी घटना घडली. या मोर्चात सहभागी झालेल्या एका ओबीसी नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कुणबी समाजाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते सुनील नावले असे त्यांचे नाव आहे. सकाळी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर दुपारी अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी सकाळी रत्नागिरीमध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणबी बांधवांसह ओबीसी समाजाचा हा मोर्चा निघाला होता. ज्यात सुनील नावले यांनी देखील सहभाग घेतला होता. मोर्चा संपल्यानंतर ते दुपारी घरी परतले. घरी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते रिक्षाने रुग्णालयात तपासणीसाठी जात होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
ओबीसी समाजावर दुःखाचा डोंगर…
सुनील नावले यांच्या निधनाने ओबीसी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समाजासाठी सातत्याने काम करणारे एक सक्रिय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या अचानक जाण्याने ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
