मुंबई- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद व 25 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, न्यायालयाने संजय राऊत यांना जामीनही मंजूर केला आहे. त्यांना वरच्या कोर्टात अपिल करण्यासाठी कोर्टाने 30 दिवसांचा अवधी दिला आहे.
शौचालय प्रकरणात संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांचे नाव घेत आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा केला होता. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांना मीरा-भाइंदरमध्ये मिळालेल्या शौचालयात कामात गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला होता. मागील दोन वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. त्यावर आता न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावे, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी आपल्या याचिकेत केली होती. या प्रकरणात न्यायालयाने आता आपला निकाल दिला असून संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांना 25 हजारांचा दंड देखील करण्यात आला आहे.
आता या प्रकरणात खासदार संजय राऊत वरच्या न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या संजय राऊत हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आता न्यायालयात या प्रकरणात दाद मागणार का? की काही निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, आता या प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
*न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला – मेधा सोमय्या*
मेधा सोमय्या यांनी या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे. संजय राऊत यांनी माझ्या कुटुंबावर आरोप करत मुलांना टार्गेट केले होते. या प्रकरणी मी एक सामान्य शिक्षिका जशी लढते तशी मी लढले. मी कोर्टाच्या निकालावर समाधानी आहे, असे मेधा सोमय्या यांनी म्हटले आहे.
काय आहे शौचालय घोटाळा?
वर्ष 2022 मध्ये मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. या कामात बनावट कागदपत्र सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मेधा सोमय्यांवर खासदार संजय राऊत यांनी केला होता. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबानेच केलेला हा घोटाळा असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता.
न्यायालयाने नोंदवले निरीक्षक..
या संदर्भात न्यायालयाने रेकॉर्डवरील कागदपत्रे, चित्रफिती पाहता प्रदर्शनी राऊत यांनी 15 आणि 16 एप्रिल रोजी मेधा सोमय्या यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी केलेले विधान मोठ्या प्रमाणात लोकांनी ऐकले आणि वर्तमानपत्रातूनही वाचले आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचंहा त्यांनी पुराव्यातून म्हटलेले आहे. त्यामुळे याचिकेतील कलम 499 (मानहानी) 500 (गुन्ह्याची शिक्षा) शिक्षा स्पष्ट करत असल्याचेही न्यायालयाने याआधी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.