
देवरूख- संगमेश्वर तालुक्यात आज सोमवारी मुलांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजल्या आहेत. तर नवागतांचे वाजत गाजत प्रभातफेरी काढून स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी भर पावसात मुलांनी शाळेची वाट धरली. दिड महिन्याच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहूर होती. शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.
शिक्षकांनी फुलांचा वर्षाव करीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती. दिड महिन्यांपासून बंद असलेल्या तालुक्यातील शाळांचे प्रवेशद्वार सकाळीच उघडण्यात आले. शाळा साफसफाई करून दोन दिवस आधीच चकचकीत करण्यात आल्या होत्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी ९९९ नवागत विद्यार्थ्यांनी शाळेत पहिल्या़दांच पाऊल ठेवले. शाळेच्या प्रवेशद्वारात येताच गुरुजनांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
शाळा सोमवारी सुरू होणार असल्याने पालक वर्गाने रविवारीच आपल्या पाल्याच्या तयारीसाठी जोरदार खरेदी केली. सोमवारी सर्व विद्यार्थी आपआपल्या तयारीने शाळेत दाखल झाले. एरवी शांत वाटणारे शाळेचे परिसर सोमवारी मात्र आँटो, दुचाकी, सायकल, चारचाकी वाहनांनी भरून गेले होते. यावर्षी पहिलीला ९९९ मुलं दाखल झाली आहेत. या लहान मुलांसाठी शाळेत पहिले पाऊल पडणार आहे. हे पाऊल रंगाच्या माध्यमातून कागदावर उमटवले गेले. पालक हे पाऊल जतन करुन ठेवणार आहेत. हा नवा उपक्रम तालुक्यात राबवला गेला. शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके व शूज यांचे पहिल्याच दिवशी वितरण करण्यात आले. पोषण आहाराबरोबरच मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.